Saturday, February 28, 2026

हृदय परिवर्तन

हृदय परिवर्तन

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर

हृदय परिवर्तन म्हणजे केवळ मत बदलणे नव्हे, तर विचार, भावना आणि वर्तन यांमधील सकारात्मक बदल होय. बाह्य बदल जबरदस्तीने घडवता येतात, पण अंतःकरणातून होणारा बदलच खरा आणि टिकाऊ असतो. आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात माणूस यशाच्या मागे धावताना कधी नकळत कठोर, स्वार्थी किंवा असंवेदनशील बनतो. अशा वेळी हृदय परिवर्तनाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. हृदय परिवर्तन का आवश्यक आहे? हृदय परिवर्तन झालं की, अहंकार कमी होतो, सहानुभूती वाढते, रागाऐवजी समजूतदारपणा येतो, नात्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. समाज बदलायचा असेल, तर आधी व्यक्ती बदलणं आवश्यक आहे आणि व्यक्तीचा बदल हा मनातून-हृदयातून सुरू होतो. आत्मपरीक्षण : पहिली पायरी हृदय परिवर्तनाची सुरुवात स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्यापासून होते. “मी कुठे चुकतो?”, “माझ्या वागण्यामुळे कुणाला दुखावलं जातं का?” असे प्रश्न स्वतःला विचारण्याचं धाडस ज्याच्यात असतं, तोच खरा बदल घडवू शकतो

क्षमा आणि समजूतदारपणा

क्षमाशीलता ही हृदय परिवर्तनाची मोठी खूण आहे. माफ करणं म्हणजे कमजोरी नाही, तर मनाची ताकद आहे. इतरांच्या चुका समजून घेण्याची तयारी ठेवली, तर मन हलकं होतं आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. कृतीतून परिवर्तन फक्त विचार बदलून उपयोग नाही, तर तो बदल कृतीत दिसायला हवा.

लहान-लहान गोष्टींमधून -  प्रेमाने बोलणं, मदतीचा हात देणं, ऐकून घेणं, आदर दाखवणं यातून हृदय परिवर्तन प्रत्यक्षात उतरू शकतं. हृदय परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे, एका दिवसात घडणारी गोष्ट नाही. पण एकदा का हा बदल सुरू झाला, की व्यक्तीच नाही तर कुटुंब, संघटना आणि समाजही सकारात्मक दिशेने बदलू लागतो. जग बदलायचं असेल, तर आधी स्वतःचं हृदय बदला. कारण परिवर्तनाची खरी सुरुवात हृदयातूनच होते.

सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा बौद्धधर्माच्या प्रचारासाठी लंकेत फिरत होती. एका प्रांतात ती फिरत असता, तेथील काही लोकांनी तिच्याशी वैर धरले. त्यापैकी एकाने तर तिला ठार मारण्याचा निश्चय केला. अमावस्येची रात्र होती. तो तरुण हातामध्ये खंजीर घेऊन संघमित्रच्या शिबिरात शिरला; परंतु अंधारामध्ये त्याला संघमित्रा कुठेच सापडली नाही. म्हणून तो काहीसा निराश होऊन अरण्यातून वाट काढीत परत जाऊ लागला. तेवढ्यात त्याची दृष्टी एका दृश्यावर गेली. एका दिव्याच्या मंद प्रकाशात त्याला एक तरुणी पाठमोरी बसलेली दिसली. ती संघमित्रा आहे हे त्याने ताबडतोब ओळखले. त्याने दातओठ खात तिच्याकडे पाहिले व खिशातून खंजीर बाहेर काढून तो योग्य संधीची वाट पाहत एका झाडाआड लपला; परंतु तेथून त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याच्या हातातील खंजीर आपोआप गळून पडला. संघमित्रेसमोर एक हाडकुळी गाय पडलेली होती. तिच्या अंगावरील जखमांना संघमित्रा मलमपट्टी करीत होती. ते दृश्य पाहताच त्या निष्ठुर तरुणाच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले. दुसऱ्या क्षणी धावत जाऊन त्याने संघमित्राच्या पायावर डोके ठेवले.

तात्पर्य : दुष्ट विचारांनी प्रवृत्त असलेल्या मानवाचेही प्रेमाने हृदयपरिवर्तन होते. विचार : हृदयाची प्रेमपूर्ण भाषा हीच धर्माची खरी भाषा आहे.

Comments
Add Comment