सजग होऊ या मुलींनो...

आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू


मुलगी लहान असते तेव्हा खरोखरंच घरामध्ये अक्षरशः परी राणी आली आहे, एखादी छोटीशी बाहुली आली आहे, संपूर्ण घराला आनंदाच्या डोहात न्हाऊ घालणारी, आनंदी करणारी अशी सगळ्यांची लाडकी या घरात आली आहे याच भावनेने आपण सगळेजण तिचं कोडकौतुक करत असतो. तिला सजवत असतो, नटवत असतो. आपली हौस पूर्ण करून घेत असतो. मुलगी मोठी होऊ लागली की, मग मात्र आपलं मन धास्तावतं. काळजी वाटू लागते. जगात सर्वत्र जे काही घडतंय ते पाहता असं वाटणं अगदी स्वाभाविकच असतं म्हणूनच पालकांनो आपल्या मुलीला सजग करू या.


मुलींना सांगू या की, तू आता मोठी होते आहेस. सुरक्षित राहण्यासाठी तू स्वतःला काही नियम घालून घेतलेस, तर ते तुझ्या हिताचे राहील. मुलांबरोबर खेळताना थोडं अंतर जरूर ठेव. मैत्री ही खरंच खूप महत्त्वाची असते पण तरी मैत्रीतही काही मर्यादा बाउंड्रीज हव्यातच. रात्रीच्या वेळी बाहेर पडणं शक्यतो टाळ आणि जर वाटलंच, तर माझी किंवा बाबांची मदत घे. चूक झाली तुझ्या हातून तर घाबरू नकोस. कारण चुका सगळ्यांच्याच हातून होतात, मात्र इतर लोकांनी तुला ब्लॅकमेल करायला किंवा तुला कंट्रोल करायला तुझ्या चुकांचा वापर करू देऊ नकोस. या जगात तुझ्या एवढं दुसरं कोणीही महत्त्वाचं नाही म्हणून इतरांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर
प्रेम कर.


रेल्वे स्टेशन, ट्रेन, एअरपोर्टवर कोणाचेही सामान उचलू नकोस. अगदी ते वयस्कर, अशक्त असले तरी. अशा वेळी तिथल्या ऑफिसरला मदतीला बोलव कारण त्या सामानाच्या आत काय असेल हे तुला
माहीत नसणार.


मुलीला सांगा की, तुला वाटत असेल की मी तुझी अति काळजी करते आहे, पण असं वाटून घेऊ नकोस. कारण बाहेरचे जग अतिशय गुंतागुंतीचे आहे. स्वतःला प्रोटेक्ट करणे ही तुझी पहिली प्रायोरिटी असू देत.


जगात नेहमीच तुमच्याशी लोकं मायेनं वागतील, असं नाही पण तू मात्र नेहमीच सावध आणि सजग राहायला हवं.


पालकांनो काही मुली या मनाने एकट्या असतात, त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकून घेणारं कोणी असतं तेव्हा त्या इतरांशी बोलताना ओव्हर शेअरिंग करतात. त्या मुली लोकांना खूप मदत करतात. कारण त्यांना लोकांच्या मनात स्वतःचं स्थान तयार करायचं असतं, पण तुम्ही तुमच्या मुलींना सांगा की, एकटे राहिल्याने सेफ वाटत नाही म्हणून नाती निर्माण करणे, जपणं, सांभाळणं याबाबत जर तू obsess असशील किंवा तुला वाटत असेल की, कोणी तुझ्याकडे पाहत नाही म्हणून तू असं वागत असशील आणि इतरांना नेहमी आधी प्रायोरिटी देत असशील, तर लक्षात ठेव की स्वतःच्या गरजा या जास्त महत्त्वाच्या आहेत.


एखाद्या ठिकाणी जाताना शक्यतो मेन रोड घे, कारण तिथे माणसं असतात, कॅमेराज असतात. छोटे गल्लीबोळ टाळ. कोणी मदत मागितली, तर नाही म्हण आणि लगेच तिथून निघ. कारण नॉर्मल परिस्थितीत मोठी माणसं लहान मुलांची मदत मागत नाहीत. जर अनोळखी व्यक्ती तुला काही देऊ इच्छित असेल, तर त्याचा वास घेऊ नकोस, स्पर्श करू नकोस किंवा खाऊ नकोस.


आपल्या कुटुंबाची वैयक्तिक माहिती कोणाही बरोबर शेअर करू नकोस. जसं की तुझ्या आई-वडिलांची नोकरी, घरचा पत्ता, घरी कोण कोण असतं? तू एकटीच घरी असतेस का? या गोष्टी इतक्या संवेदनशील असतात की याचा कोणीही गैरवापर करू शकतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या गोष्टी अनोळखी किंवा अविश्वास ठेवावा अशा व्यक्तींशी शेअर करू नकोस. तुला जर कोणी असं म्हणत असेल की तुझ्या आई-बाबांना आपण जे बोलतोय ते सांगू नकोस, तर तू ताबडतोब सगळं काही घरी आई-वडिलांना येऊन सांग. कारण तो माणूस नक्कीच काहीतरी वाईट गोष्ट लपवतोय हे लक्षात ठेव. तुझी सुरक्षितता ही इतर गोष्टींपेक्षा महत्त्वाची आहे. मनातल्या इन्स्टिंक्टवर विश्वास ठेव. बोलायला घाबरू नकोस. हे जग सुंदर आहे पण ते नेहमीच सुंदर नसतं. तुझी एक चूक संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल, मात्र एक
चांगली सवय तुझं आयुष्य सुरक्षित करू शकते.


मोठी होशील तेव्हा एखाद्या मुलाला तू आवडशील. तुझेही त्याच्यावर प्रेम बसू शकतं. अशा वेळेस एक लक्षात ठेव की, दुसऱ्याकरिता आपली स्वप्नं सोडू नकोस, कारण जर भविष्यात गोष्टी मनाप्रमाणे पुढे गेल्या नाहीत, तर मग तू स्वतःच्या निर्णयाबद्दल रिग्रेट करशील. जर खरंच तो तुझ्यावर मनापासून प्रेम करत असेल, तर तुझ्या स्वप्नांना पूर्ण करताना तो तुझ्या सोबत राहील. तुला मागे सोडणार नाही. कदाचित तुला असं म्हणेलही तो की, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. पण एक लक्षात ठेव नुसते सुंदर शब्द कामाला येत नाहीत. शब्दांना जोड हवी कृतीची, नाही तर ते पोकळ शब्द ठरतील.


नातं खरं आहे, सच्चे आहे हे कसं ओळखशील?


नात्यामध्ये तुला त्या मुलाबरोबर कसं वाटतं हे महत्त्वाचं. तो काय म्हणतो, काय बोलतो हे नाही. त्याच्याबरोबर सुरक्षित वाटतेय का? विश्वास वाटतोय का? हे तपासून पाहा. तुला ज्या गोष्टी कणखर आणि मजबूत बनवतील अशा गोष्टींवर फोकस कर. तुझं स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. तुझं काम महत्त्वाचे आहे. स्वतःसाठी स्टॅण्ड घे. स्वतःची अॅडमायरर बन. तू शाईन होण्यासाठी इतर लोक कधी तुझी स्तुती करतील याची वाट पाहू नकोस. जिथे लोक तुझी कदर करतात, तिथेच थांब. प्रेम म्हणजे काळजी करणं असतं. जर इतरांनी तुला भेटवस्तू दिल्या त्याबद्दल कृतज्ञता जरूर व्यक्त कर, पण आश्चर्यचकित झालंय असं दाखवू नकोस.


प्रेमात असं वाटतं की, हाच तो आहे, जो माझ्या आयुष्यामध्ये मला हवा होता असा जोडीदार आहे. पण खरं म्हणजे हा एक जुगारच असतो कारण इथे दान टाकावं लागतं. आपल्याला काय मिळणार आहे हे ठाऊक नसतं म्हणून हे विसरू नकोस की आंधळेपणाने प्रेमामध्ये घेतलेला निर्णय हा खड्ड्यात नेणारा असतो.तू त्याच्यावर कितीही प्रेम करत असलीस तरी स्वतःचं कुटुंब तिसऱ्या माणसामुळे उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घे. लग्नाआधी प्रेग्नेंट होणार नाही याची काळजी घे. माझं हे बोलणं कदाचित तुला अति स्पष्ट वाटेल. पण विचार करशील, तर नक्कीच लक्षात येईल की, नात्यात चूक झाली तर बोट आपल्याकडेच दाखवलं जातं.


जर त्या मुलाने पैसे उधार मागितले किंवा लोन डॉक्युमेंट्सवर सही कर असं म्हटलं तर तसं करू नकोस. तुला वाटेल की त्याला मदत करावी पण गोष्टीमधील सत्यता न तपासता निर्णय घेतलेस, तर तू स्वतःच प्रेम आणि पैसा दोन्ही गोष्टी गमावून बसण्याचा धोका आहे. लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर त्या मुलाने अनादराने वागवणं सहन करू नकोस. जर तो तुझ्यावर ओरडला, तुझा अपमान केला, तुझ्यावर हात उगारला तर त्याला वाचवण्यासाठी कारणे सांगत बसू नकोस. प्रेम आहे ना मग तुझी डिग्निटी पणाला लावू नकोस.


एकमेकांना सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे पण दुसऱ्याला आनंदी करण्यासाठी स्वतःच्या अपेक्षा गाडून टाकू नकोस. मुलींची स्वप्नंही इतरांच्या स्वप्नांइतकीच मौल्यवान असतात हे विसरू नकोस. जरी तुला कोणी आयुष्यभर सांभाळण्याचं वचन देत असलं तरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी हो. स्वातंत्र्य हे महत्त्वाचं असतं. उतावळेपणाने, भावनेच्या भरात आपला जॉब किंवा काम सोडू नकोस. स्त्रीने आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही स्वावलंबी असायला हवं. शिक्षण घे. मोठी हो, स्वतःला कणखर बनव. अशा तऱ्हेनेच तू तुझ्या आयुष्यात आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकशील.


लग्नाची घाई करू नकोस. आधी स्वतःसाठी पैसे कमव. संसार नीट सुरू झाला, सेटल झालीस की मगच मुलांचा विचार कर. वेळ घे. तुला जे बनायचे आहे, जी तुझी स्वप्नं आहेत त्यांना नंतर वेळ मिळत नाही. ती पुढे ढकलत राहावी लागतात, म्हणून आधी स्वतःला मोठं कर, बाकी सर्व होईलच.

Comments
Add Comment

ध्येयप्रती निष्ठावान राहा

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे स्वतःला पूर्णपणे स्वीकारा. आपल्या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता? ती दूरदृष्टी, ते

वेळेचे महत्त्व

जीवनगंध : पूनम राणे शारदा विद्यालयात रेहान नावाचा विद्यार्थी शिकत होता. तो इयत्ता दहावीला होता. अत्यंत नम्र,

कोकणचा शिमगा... काळजातली ओढ

संस्कृती : विभा मसुरकर  कोंकणात होळीला शिमगा म्हणतात. फाल्गुन पंचमीपासून अनेक ठिकाणी या उत्सवाला सुरुवात

प्रतिभावंत संगीतकार पुत्रामुळे संगीतकार पित्याला नवी ओळख...

स्मृतिपटल : अनिल रा. तोरणे प्रत्येक पित्याप्रमाणे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांनाही वाटत असे की,

जंगलांच्या सहनशक्तीची कसोटी

पर्यावरण : मिलिंद बेंडाळे हवामान बदल हा केवळ तापमानवाढीचा प्रश्न नाही, तर ती परिसंस्थांच्या सहनशक्तीची कसोटी

एकादशीचे व्रत भद्रशील उपाख्यान

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे हिंदू धर्मात अनेक व्रत वैकल्ये आहेत. प्रत्येक व्रत वैकल्याचे आपआपले