Saturday, February 28, 2026

प्रतिभावंत संगीतकार पुत्रामुळे संगीतकार पित्याला नवी ओळख...

प्रतिभावंत संगीतकार पुत्रामुळे संगीतकार पित्याला नवी ओळख...

स्मृतिपटल : अनिल रा. तोरणे

प्रत्येक पित्याप्रमाणे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांनाही वाटत असे की, आपला एकुलता एक पुत्र राहुल देव बर्मनने आपल्यापेक्षा चार पावले पुढे राहून नाव व पैसा कमवावा आणि आपली ओळख त्याच्या नावामुळे व्हावी! प्रत्यक्षात सचिन देव बर्मन छोट्या छोट्या बाबींवरून राहुल देव यांना रागावत असत. सचिन देव दररोज सकाळी समुद्र किनाऱ्यावर चालावयास जात असत. असेच ते एकदा गेले असताना काही लोकांनी त्यांना पाहून म्हटले की, ते पाहा अमक्या अमक्या संगीतकाराचे वडील चालले आहेत! आपला पुत्र राहुल देव याच्या नावाने आपण स्वत: ओळखले जाऊ लागलो आहोत हे लक्षात येताच पिता सचिन देव बर्मन यांचा आनंद गगनात मावेना! आपल्या निवासस्थानी परतताच त्यांनी घडलेला प्रकार राहुल देव यांना एका दमात सांगून टाकला!

सचिन देव बर्मन आणि मीरा देव बर्मन या दांपत्याला २७ जून, १९३९ या दिवशी राहुल देव हे पुत्ररत्न झाले. एखाद्या यशस्वी पित्याचा मुलगा पित्याप्रमाणे यशस्वी होतोच असे नाही; परंतु पिता सचिन देव बर्मन यांच्यासारख्या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली लहानाचे मोठे झालेले राहुल देव ऊर्फ आर. डी. बर्मन यांनी आपल्या वडिलांप्रमाणे चित्रपट संगीतक्षेत्रात तर नाव कमावलेच शिवाय अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणूनही आपला परिचय दिला.

१९६१ साली प्रदर्शित झालेल्या उस्मान अलीनिर्मित ‘छोटे नवाब’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे राहुल देव बर्मन आणि हास्य अभिनेते मेहमूद यांची मैत्री विलक्षण होती. मेहमूद दिग्दर्शित ‘भूत बंगला’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच्या काळात मेहमूद यांनी राहुल देव बर्मन यांना त्या चित्रपटाचे चित्रीकरण पाहावयास सेटवर येण्यासाठी आमंत्रित केले. राहुल देव सेटवर दाखल झाल्यावर त्यांच्याशी बोलता बोलता मेहमूद यांनी त्यांना एक ड्रेस देत म्हटले, की ही तुमच्यासाठी भेट आहे. तुम्ही हा ड्रेस परिधान करून दाखवा. मित्रवर्य मेहमूद यांनीच तसे म्हटल्याने राहुल देव ते टाळू शकत नव्हते. त्यांनी तो ड्रेस परिधान केल्यावर ते मेहमूद यांच्या रंगभूषा कक्षात (मेकअप रूम) बसून गप्पा मारीत असताना अचानक मेहमूद यांचे बंधू उस्मान यांनी पाठीमागून येऊन बादलीभर पाणी राहुल देव यांच्यावर ओतले! अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे राहुल देव कमालीचे संतापले! तेवढ्यात मेहमूद त्यांना म्हणाले, आता काही होऊच शकत नाही. सेटवर पावसाच्या प्रसंगाचे (सीन) चित्रीकरण केले जात आहे आणि आता तुम्ही भिजलाच आहात, तर पावसात भिजत असतानाचे एक दृश्य (शॉट) तुम्हाला द्यावे लागेल. मित्रवर्य मेहमूद यांचे म्हणणे शिरसावंद्य मानून राहुल देव सेटवर गेले आणि त्यांच्यावरील दृश्य व्यवस्थित चित्रित (ओके) होताच त्या सेटवर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. नेमके काय घडले आहे हे राहुल देव यांच्या लक्षात आले नाही. तेवढ्यात मेहमूद त्यांना म्हणाले, आता तुम्ही पुरते अडकला आहात. तुम्ही सलगतेत (कंटिन्युइटी) आलेले आहात आणि या चित्रपटावर माझा बराच पैसा गुंतलेला असल्याने ही भूमिका आता तुम्हाला करावीच लागेल आणि राहुल देव बर्मन यांनी ती भूमिका केली.

सचिन देव बर्मन दररोज सकाळी जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर चालण्यासाठी जात असत. चालून झाल्यावर वांद्र्यातील लिंकिंग रोडवरील ‘द जेट’ या आपल्या बंगल्यात परतल्यावर बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर बसून चहा पीत असत. चहापान चालू असतानाच ते राहुल देव यांना म्हणत, की काय हे पंचम, तू स्थूल होत चालला आहेस. तू एखादा शारीरिक व्यायामही करत नाहीस...! वडिलांनी असे सुनावल्यावरही राहुल देव त्यांना प्रत्युत्तर देत नसत. वडील जे काही सांगतात ते योग्यच आहे, असे त्यांना वाटत असे.

असेच एकदा सचिन देव बर्मन सकाळी चालायला जाऊन आपल्या निवासस्थानी परतल्यावर राहुल देव यांना म्हणाले, पंचम, आय अॅम व्हेरी प्राऊड ऑफ यू ! वडिलांचे शब्द कानावर पडताच राहुल देव त्यांच्याकडे बघतच राहिले. त्यांच्या मनात विचार आला की, आजवर वडिलांनी मला रागावण्याव्यतिरिक्त कधी माझे कौतुक केलेले नाही. मग आज असे घडले असावे की ते माझी तोंड भरून स्तुती करीत आहेत? राहुल देव यांनी त्यांना विचारले, काय... काय... काय म्हणालात तुम्ही...? सचिन देव त्यांना पुन्हा तेच म्हणाले, आय अॅम प्राऊड ऑफ यू! तू काही तरी चांगले करतो आहेस. राहुल देव यांनी त्यांना विचारले, काय करतोय मी? त्यावर सचिन देव म्हणाले, हे बघ पंचम आज एक नवलाईची घटना घडली. मी रोज सकाळी जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर चालण्यासाठी जातो. त्या ठिकाणी इतरही अनेक लोक येतात. त्यात लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्तींची संख्याही बरीच असते. अनेकदा मला पाहून लोक मोठ्याने कुजबुजतात की ते पाहा एस. डी. बर्मन चालले आहेत. ते ऐकून माझ्या मनात विचार येतो की हे माझे चाहते असावेत. पण आज मात्र कमालच झाली! त्यावर राहुल देव यांनी काहीसे चमकून त्यांना विचारले, की काय कमाल झाली? सचिन देव म्हणाले, आज तिकडे आलेल्यांनी मला पाहून म्हटले, ते पाहा आर. डी. बर्मन यांचे वडील चालले आहेत!

Comments
Add Comment