वार्तापत्र : विदर्भ
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या संतनगरीला भेट देऊन श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन देखील घेतले. त्याला निमित्त झाले होते ते शेगाव येथे आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्यावतीने आयोजित आरोग्य शिबीर आणि आरोग्य परिषदेच्या उद्घाटनाचे. हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवरही राष्ट्रपतींसोबत या संमेलनासाठी उपस्थित होते.
शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील अकोला आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असणारे एक छोटेसे गाव, सध्या शेगाव हा तालुका झाला आहे. एरवी या गावाची लोकसंख्या जेमतेम एक लाखांच्या आसपास असावी. या गावाला खरे महत्त्व प्राप्त झाले आहे ते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या परिसरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळामुळे. श्री संत गजानन महाराज यांचे वास्तव्य दीर्घकाळ शेगाव येथेच राहिले होते. १९०९ साली त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. त्यानंतर तिथे त्यांचे मंदिर उभे झाले आणि आज शेगाव हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. इथे फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही गजानन महाराजांचे भक्त दर्शनाला येत असतात. श्री गजानन महाराज यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्याबद्दल तसेच त्यांच्या दैवी चमत्काराबद्दल अनेक कथा इथे सांगितल्या जातात. श्री संत गजानन महाराजांची पोथी देखील आज अनेक कुटुंबांमध्ये नियमित वाचली जाते आणि गावोगावी गजानन महाराजांची मंदिरे देखील उभी राहिलेली आहेत. त्यावरून त्यांचे भक्त किती मोठ्या प्रमाणात आहेत हे दिसून येते.
सुरुवातीला इथे फक्त महाराजांची समाधी होती. नंतर मंदिर झाले, आता तिथे चार-पाच मोठे भक्तनिवासही झाले आहेत. त्याशिवाय इतरही सुसज्ज अशी व्यवस्था तिथे निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो भाविक इथे दर्शनाला येत असतात. त्यांची निवासाची व्यवस्था अत्यल्प दरात होत असते, तसेच भोजनादी सेवा देखील इथे होत असते. त्यामुळे हे स्थान कायम गजबजलेलेच असते. शेगाव हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे सरकारने धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करायला हवा. तसेच हे गाव मुंबई-कलकत्ता रेल्वे मार्गाजवळ वसलेले आहे. काही ठिकाणी सुधारणांना सुरुवात झाली आहे. एरवी मुंबई-कलकत्ता रेल्वे मार्गावर शेगाव हे स्टेशन फक्त गजानन महाराज भक्तांसाठीच ओळखीचे राहिले. अन्यथा बाकी प्रवाशांसाठी शेगाव रेल्वे स्टेशनवर कचोरी चांगली मिळते म्हणून लोक आठवणीने चौकशी करतात. मात्र आज त्या कचोरीलाही जुनी चव राहिलेली नाही.
संत गजानन महाराज संस्थानच्या व्यवस्थापनाने इथे व्यवस्था देखील अत्यंत चोख अशी ठेवलेली आहे. मात्र असे असले तरी आजवर या श्रद्धास्थानाला देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांनी कधीही भेट दिली नव्हती. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या काळात ज्यावेळी सोमनाथ मंदिराचे लोकार्पण झाले त्यावेळी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद लोकार्पणाला जाणार कळल्यावर पंडित नेहरू चांगलेच नाराज झाले होते आणि त्यांनी राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथला जाण्यासाठी विरोधही केला होता अशी इतिहासात नोंद आहे. एकदा उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत हे इथल्या आनंद सागर प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभासाठी येऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर गेल्या २३-२४ वर्षांत द्रौपदी मुर्मु यांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. याआधी बुलढाणा जिल्ह्यातील मुकुल वासनिक हे देखील केंद्रीय मंत्री होते. मात्र ते काँग्रेसचे मंत्री असल्यामुळे त्यांनी कधी कोणत्याही अतिविशिष्ट व्यक्तीला शेगावला आणण्याचे प्रयत्न केले नव्हते. तो योग प्रतापराव जाधव यांच्यामुळे आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार म्हणजे पूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागणार हे ओघानेच आले. त्यांच्या या कार्यक्रमासाठी सरकारी यंत्रणेने सुमारे तीन महिने आधीपासून मागे लागून संपूर्ण गाव अगदी चकाचक करून ठेवले. गावात बऱ्याच सुधारणा देखील झाल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगावला आल्या. त्यांनी शेगावला महाराजांच्या समाधीचे दर्शन देखील घेतले. श्री संत गजानन महाराज यांनी लोककल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले होते. त्यांचा गण गण गणात बोते हा मंत्र सर्व जीवांना समानतेचा संदेश देतो असे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले. पूर्ण मंदिर परिसर त्यांनी न्याहाळला आणि संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतरच त्या अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाने आयोजित कार्यक्रम स्थळी रवाना झाल्या. यावेळी मुर्मू म्हणाल्या की, देश बलशाली करायचा असेल तर इथले नागरिक निरोगी हवेत आणि त्यासाठी आयुर्वेदच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मानवी जीवनात वनौषधी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जंगले वाचवणे आणि वनौषधींची मोठ्या प्रमाणात लागवड करून त्याची जपणूक आणि संवर्धन करणे हे गरजेचे असल्याचे नमूद केले. आज औषधी वनस्पतींवरून आयुर्वेदात अनेक औषधे तयार केली जातात. त्यावरही मोठ्या प्रमाणात संशोधन होणे आणि आयुर्वेदाचा मानवी जीवनात जास्तीत जास्त उपयोग करून घेणे गरजेचे असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. आरोग्य मंत्रालय हे देशातील आरोग्यवस्थेवर देखरेख करते आणि नियंत्रण करते. मात्र संशोधनात्मक बाबींकडे त्यांना लक्ष देणे होत नाही. म्हणूनच सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केली. त्यायोगे औषधीविषयक संशोधन केले जाईल आणि प्राचीन भारतीय आरोग्यवस्थेवर संशोधन देखील करता येईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच केंद्राप्रमाणेच प्रत्येक राज्यात आयुष मंत्रालय स्थापन करून त्या त्या राज्यातील आरोग्यविषयक संशोधनांना उत्तेजन कसे देता येईल हा प्रयत्न केला जाणार असल्याचे केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले, तर भारतीय आहार पद्धतीत पूर्वापार औषधी तत्त्वे असलेल्या वनस्पतींचाच वापर होत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कधीही आजारपण उद्भवू नये अशी सोय असलेली पारंपरिक ज्ञानावर आधारित आपली जीवनपद्धती होती, याकडे राज्यपाल देवाव्रत आचार्य यांनी लक्ष वेधले. आपल्या आहारात अनावश्यक पदार्थांचा अंतर्भाव झाल्यामुळे आजार वाढल्याचे प्रमाण दिसून आले आहे. त्यामुळे आयुर्वेद जीवन पद्धतीनुसार जीवन जगल्यास आजार कमी होतील, असेही राज्यपालांनी सांगितले. एकूणच राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे शेगावमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. हे चैतन्य असेच कायम टिकावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.







