- महसूल विभागातील १५ सेवांचा एकाच ठिकाणी लाभ
मुंबई : राज्यभरातील सामान्य जनतेला शासकीय सेवांचा लाभ त्वरित मिळावा यासाठी महसूल विभागाने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यात सहा शिबिरे आयोजित केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधीमंडळात दिली.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी १८ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर पूर्वतयारी करण्यात येणार आहे. नागरिकांचे अर्ज गोळा करणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे ही कामे या काळात पूर्ण केली जातील, जेणेकरून शिबिराच्या दिवशी प्रत्यक्ष लाभ देता येईल.
छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ च्या प्रभावी व यशस्वी अंमलबजावणीसाठी दृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.
या बैठकीत अभियानाच्या नियोजन, अंमलबजावणीची कार्यपद्धती तसेच नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याबाबत सविस्तर चर्चा केली.… pic.twitter.com/k3nlH91aOb — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 28, 2026
शिबिरांचे वेळापत्रक :
अभियान तीन टप्प्यांत राबवले जाणार असून त्याचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:
मार्च महिना : तालुक्यातील दोन महसूल मंडळांसाठी ७ मार्च आणि १४ मार्च (शनिवार) रोजी शिबिरे होतील.
एप्रिल महिना : तालुक्यातील दुसऱ्या दोन मंडळांसाठी १० एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी आयोजन केले जाईल.
मे महिना : नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर ८ मे आणि १५ मे (शुक्रवार) रोजी दोन शिबिरे पार पडतील.
अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यात एकूण ६ शिबिरांच्या माध्यमातून महसूल प्रशासन जनतेच्या दारी पोहोचणार आहे.
१५ महत्त्वाच्या सेवांचा मिळणार लाभ :
या समाधान शिबिरांमध्ये महसूल खात्याशी संबंधित १५ विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये दाखले, उतारे आणि इतर शासकीय योजनांच्या लाभांचा समावेश आहे. या अभियानासाठी सर्व खासदार, आमदार, पालकमंत्री तसेच सर्व मंत्र्यांना त निमंत्रित करण्यात आले असून, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हे जनतेचे प्रश्न मार्गी लावले जातील, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.







