Saturday, February 28, 2026

अजित पवार यांच्या निधनाबद्दल रोहित पवारांचे राजकारण अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद - आनंद परांजपे

अजित पवार यांच्या निधनाबद्दल रोहित पवारांचे राजकारण अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद - आनंद परांजपे

अजितदादा पवार यांच्या दु:खद व दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत ते अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रोहित पवार यांच्या राजकारणाला ठाणे येथे माध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व पार्थ पवार यांच्यासमवेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणावे अशी मागणी केली होती. शिवाय त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही केली होती मात्र दुर्दैवाने आमदार रोहित पवार गेले काही दिवस राजकारण करत आहेत त्याबद्दल आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त केली.

गुन्हा दाखल करण्याचे राजकारण रोहित पवार यांनी थांबवावे :

शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रोहित पवार यांनी भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करुन गुन्हा नोंदवला जाईल असे आश्वस्त करुन देखील आज शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची रोहित पवार यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त करुन देखील गुन्हा दाखल करण्याचे राजकारण रोहित पवार यांनी थांबवावे.

कुटुंबाने एकटं कसं पाडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे :

खरंतर २ जुलै २०२३ मध्ये वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांना कुटुंबाने एकटं कसं पाडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. किंबहुना लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार या बाहेरच्या पवार आहेत आणि घरातील पवारांना मतदान करा असे वक्तव्य वरिष्ठांकडून करण्यात आले होते याची आठवण करून देताना आनंद परांजपे यांनी विधानसभा निवडणुकीत अत्यंत हताश होऊन कुटुंबाने मला एकटं पाडलं पण बारामतीची जनता मला एकटं पाडणार नाही ही उद्विग्नता दादांनी व्यक्त केल्याचा व्हिडिओ आजही सगळ्यांकडे पहायला मिळत असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा आहे :

आज अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राजकारण केले जातेय. ते चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार, पार्थ, जय पवार यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. राष्ट्रीय अधिवेशनात जय पवार यांना मागील खुर्चीत बसवण्यात आले अशाप्रकारचा चुकीचा व्हिडीओ माध्यमांमध्ये दाखवण्यात आला शिवाय तसा आरोप रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. मुळात अधिवेशनाचे फेसबुक लाईव्ह सुरू होते त्यावेळी सुत्रसंचालक सुरज चव्हाण हे जय पवार यांना पुढे बसण्यासाठी आग्रह करत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नेत्यांवर जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत असेही आनंद परांजपे म्हणाले.

महाराष्ट्रासमोर सत्य आले पाहिजे पण अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातावरुन जे राजकारण केले जात आहे ते चूकीचे आहे. आम्ही सर्वजण म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नेते नाही तर महाराष्ट्राने अजितदादांसारखं नेतृत्व मुकलंय ती महाराष्ट्रातील जनता सत्य बाहेर येण्याची आतुरतेने वाट पहात आहे असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >