Saturday, February 28, 2026

Budget Session : मुंबईसह महानगरात नामांकीत रुग्णालयांकडून 'आयुष्यमान भारत'चा लाभ देण्यास नकार

Budget Session : मुंबईसह महानगरात नामांकीत रुग्णालयांकडून 'आयुष्यमान भारत'चा लाभ देण्यास नकार

- विधानसभेत सर्वपक्षीय आमदार आक्रमक; महिनाभरात तोडगा काढण्याचे मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : मुंबईसह महानगरातील नामांकीत रुग्णालयांकडून आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यास नकार दिला जात असून, गरीब रुग्णांची हेळसांड होत आहे. परिणामी 'एमएमआर' प्रदेशात या योजनेचा काहीही उपयोग होत नसल्याचा आरोप करीत शनिवारी (२८ फेब्रुवारी) विधानसभेत सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले.

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील आयुष्यमान भारत योजनेंतर्गत रुग्णालये उपचार नाकारत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अतुल भातखळकर, संजय केळकर, मनिषा चौधरी, वरुण सरदेसाई, हेमंत ओगले आदी आमदारांनी याच उपप्रश्न उपस्थित केले. "मुंबई आणि एमएमआर रिजनमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आयुष्यमान भारत योजनेतील रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतात. या योजनेमधील रुग्णांना तेथे प्रवेशही दिला जात नाही. त्यामुळे या योजनेचा मुंबई एमएमआर रिजनमध्ये काहीही उपयोग होत नाही", असा आरोप आमदार अतुल भातखळकर आणि वरूण सरदेसाई यांनी केला. त्यावर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी साचेबद्ध उत्तर दिल्यामुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करीत, यात सरकारला नेमकी अडचण काय आहे, असा सवाल केला.

दरपत्रक जाहीर करण्याची मुख्य मागणी आहे. मंत्री मुळ प्रश्नाला बगल देत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रचार प्रसारावर राज्य सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. मात्र मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये या योजनेचा फायदा रुग्णांना होत नाही. अनेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या योजनेंतर्गत समावेशाला नकार देतात. यामुळे रुग्णांना चांगल्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नाही. तसेच या योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे. त्यामुळे आहे त्या सरकारी उपचारांच्या दरावर अधिक रुग्णालयाची नोंदणी करणार का? आणि मुंबई एमएमआर रिजनमध्ये वेगळे दरपत्रक लागू केले जाईल का, असे प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केले.

दरपत्रक बदलल्याशिवाय पर्याय नाही - संजय केळकर

आमदार संजय केळकर म्हणाले, आम्ही मोठ्या प्रमाणात कॅम्प घेऊन आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले. मात्र कार्ड घेऊन गेलेल्या रुग्णांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही कार्ड देणेच बंद केले आहे. नोंदणी असलेल्या हॉस्पिटलमध्येही अशा कार्डधारक रुग्णांना उभे देखील केले जात नाही. त्यामुळे एमएमआर रिजनमध्ये दरपत्रक बदलल्याशिवाय चांगले हॉस्पिटल या योजनेत समाविष्ट होणार नाही. दरपत्रक बदलण्याबद्दल सरकार काय विचार करत आहे, असा सवाल केळकर यांनी उपस्थित केला. सत्ताधारी आमदारांनी घरचा आहेर दिल्यानंतर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी एमएमआर रिजनमधील नामांकित हॉस्पिटलचा योजनेमध्ये समावेश करण्यासाठी या महिन्याच्या आत बैठक घेऊ, असे आश्वासन सभागृहाला दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >