नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या वैज्ञानिक कामगिरीचा उत्सव साजरा केला. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून मोदींनी विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक कुतूहलाचा उत्सव साजरा करतो, जो आपल्या देशाला पुढे नेत राहतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे की, "हा दिवस सर सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या 'रमण इफेक्ट' या क्रांतिकारी शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो." या शोधामुळे भारतीय संशोधनाला जागतिक नकाशावर भक्कम स्थान मिळाले. आपल्या तरुणांना सक्षम बनवण्याचा, संशोधन परिसंस्था अधिक बळकट करण्याचा आणि राष्ट्र विकास तसेच जागतिक कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
तसेच तरुण नवोन्मेषकांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि संशोधनाच्या संधींचा विस्तार करणे यावर सरकारचे सतत लक्ष केंद्रित असल्याचे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
Today, on National Science Day, we celebrate the spirit of research, innovation and scientific curiosity that drives our nation forward. This day commemorates the groundbreaking discovery of the Raman Effect by Sir CV Raman. This discovery placed Indian research firmly on the… pic.twitter.com/YcjOAdPosr
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
विज्ञान दिवसाचा इतिहास :
नोबेल पारितोषिक विजेते सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला. त्यानिमित्त दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९२८ मध्ये जाहीर झालेल्या या शोधामुळे प्रकाशाचे विकिरण दिसून आले आणि १९३० मध्ये सी.व्ही. रमन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक जिंकणारे ते पहिले आशियाई बनले.







