मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. "माणगाव-इंदापूर बायपासचा काही भाग वगळता, येत्या मे महिन्यापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम पूर्णत्वास गेलेले असेल," अशी महत्त्वाची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज विधानपरिषदेत दिली. भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले.
मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या ...
सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभाग घेताना आमदार प्रवीण दरेकर आक्रमक पाहायला मिळाले. "हा महामार्ग रेकॉर्डब्रेक उशिरा होणारा मार्ग ठरला आहे. कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे चाकरमान्यांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत आहे. आता होळीचा सण जवळ आला आहे, अशा वेळी प्रवाशांना हा विहित वेळेत पूर्ण होऊन दिलासा मिळणार का?" असा थेट सवाल दरेकरांनी विचारला. तसेच, महाड येथील गांधारपाले लेणी परिसरात पर्यटन विकासासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावर सकारात्मक उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कामाचे वेळापत्रक स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, "चिपळूणचा महत्त्वाचा पूल मे २०२६ पर्यंत खुला होईल, तर हातखंबा उड्डाणपुलाचे काम याचवर्षी एप्रिलपर्यंत पूर्ण होत आहे. माणगाव-इंदापूर मार्गाची मुदत २०२७ असली तरी, उर्वरित महामार्ग मे २०२६ पर्यंत प्रवासासाठी सज्ज असेल." तसेच, गांधारपाले लेणी येथे पर्यटन विभागाच्या माध्यमातून आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. सरकारच्या या भूमिमेमुळे कोकणच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.







