Saturday, February 28, 2026

आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्हा येथील सामरलकोट मंडलमधील वेटलापालेम गावात एका फटाका निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान १८ जणांचा जळून मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. स्फोटाच्या वेळी कारखान्यात जवळपास ३० कामगार उपस्थित होते अशी माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, काही महिला कामगार कारखान्याच्या आत स्फोटक साहित्य तयार करत असताना अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की संपूर्ण कारखान्याची इमारत क्षणात जमीनदोस्त झाली. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात असून बचाव पथके युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याचा मालक घटनेनंतर फरार झाला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही मृतदेह शेजारच्या शेतात जाऊन पडले. स्फोटानंतर अनेक तास कारखान्यातून अधूनमधून लहानमोठे स्फोट होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दाट धुरामुळे आसपासच्या किमान पाच गावांवर परिणाम झाला असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने मदतकार्य राबवण्याचे आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार राज्याच्या गृहमंत्री वांगलापुडी अनीता घटनास्थळी रवाना झाल्या असून त्या परिस्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवणार आहेत. सध्या मुख्यमंत्री विजयनगरम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

चंद्रबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शोक व्यक्त करत या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी पीडित कुटुंबांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले असून संपूर्ण घटनेवर सरकारचे बारकाईने लक्ष असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित कारखान्याकडे वैध परवाना होता का, तसेच सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचा तपास प्रशासन करत आहे. याच गावात यापूर्वीही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती, त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा