मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीवर काम करताना आठव्या मजल्यावरून सहा कामगार खाली कोसळल्याची दुर्घटना शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सहाही कामगार गंभीर जखमी :
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इमारतीचे बांधकाम सुरू असताना हे कामगार ८व्या मजल्यावर काम करत होते. अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. या अपघातात सहाही कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्याने घडला अपघात :
माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कामगारांनी आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर केलेला नव्हता. उंच इमारतींवर काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि इतर सुरक्षात्मक उपकरणे वापरणे बंधनकारक असते. मात्र या ठिकाणी नियमांचे पालन झाले नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. योग्य सुरक्षा साधने वापरली असती तर हा अपघात टाळता आला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
तत्काळ मदतकार्य सुरू :
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.







