Friday, February 27, 2026

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण
जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) 'प्रचंड'मधून उड्डाण केले आणि एक फेरी मारली. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्यासोबत त्यांनी उड्डाण केले. भारताचे हवाई दल राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण परिसरात वायुशक्ती नावाने कवायती करत आहे. या मोहिमेत भारताचे हवाई दल सामर्थ्याची चाचपणी करणार आहे. या कवायतींच्या पाहणीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग पोखरणमध्ये आहेत. भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात युद्धाभ्यास करणार आहे. हवाई दलाच्या या कवायतीत ७७ लढाऊ विमानं, ३४ हेलिकॉप्टर, ८ मालवाहक विमानं यांचा ताफा सहभागी होणार आहे. भारतीय हवाई दल करणार असलेल्या 'ऑपरेशन वायुशक्ती'मध्ये राफेल, सुखोई, मिराज-२०००, मिग-२९, जग्वार आणि तेजस आदी लढाऊ विमानांचा ताफा सहभागी होणार आहे. यंदाचे 'ऑपरेशन वायुशक्ती' हे ऑपरेशन सिंदूरच्या यशाला नव्याने उजाळा देणार आहे. हवाई वर्चस्व स्थापन करणे, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा सुयोग्य वापर करणे, विविध संरक्षण दलांशी समन्वय राखून मर्मभेदी असा हल्ला हल्ला करणे आदी सराव या निमित्ताने होतील. भारतीय हवाई दल देशांतर्गत आणि परदेशातील संघर्षग्रस्त भागातून वेगाने लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याच्या कारवाईचाही सराव करणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा