मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिकेअंतर्गत स्थानक क्षेत्र विकासासाठी प्रकल्प – SMART (Station Area Development along the Mumbai–Ahmedabad High-Speed Rail Corridor) अंतर्गत उच्चस्तरीय कार्यशाळेचे आयोजन बांद्रा-कुर्ला संकुल येथील मुख्यालयात केले. ही कार्यशाळा भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था (JICA) यांच्या तांत्रिक सहकार्याचा आराखडा बनवण्यासाठी आयोजित करण्यात आली.
मुंबई – अहमदाबाद उच्चगती रेल्वे (MAHSR) मार्गिकेत एकूण १२ स्थानके असून त्यापैकी चार; बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही महाराष्ट्र राज्यात येतात. प्रकल्प – SMART अंतर्गत ठाणे व विरार या स्थानकांची प्राधान्याने निवड करण्यात आली असून उच्चगती रेल्वे पायाभूत सुविधा ही नियोजित व शाश्वत शहरी विकासासाठी उपयुक्त ठरेल, या उद्देशाने स्थानक क्षेत्र विकास आराखडे तयार करण्यात येत आहेत.
कार्यशाळेदरम्यान जायका तज्ज्ञांनी जपानमधील ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, जमीन मूल्य हस्तगत (Land Value Capture), एकात्मिक वाहतूक नियोजन, पर्यावरणीय शाश्वतता, हितधारक सहभाग आणि स्थानकाभोवती पुनरुत्थानात खाजगी क्षेत्राच्या सहभागासंबंधी आंतरराष्ट्रीय उत्तम पद्धती सादर केल्या. एमएमआरडीएच्या नगररचना पथकाने व जायका तज्ज्ञांनी ठाणे व विरार स्थानक क्षेत्र विकास आराखड्यांवर सविस्तर चर्चा करून नियोजन आराखडा , अंमलबजावणीचा कृती मार्गनकाशा व पुढील टप्प्यातील आंतरसंस्थात्मक समन्वय यावर विचारविनिमय केला.
त्यानंतर डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी एमएमआरडीए, ठाणे, विरार येथील संबंधित अधिकारी तसेच, नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) आणि जायकाच्या अधिकाऱ्यांसह सविस्तर आढावा बैठक घेतली. त्यांनी उच्चगती रेल्वे विकास तत्त्वांशी सुसंगत असे एकात्मिक स्थानक क्षेत्र विकास आराखडे निश्चित कालमर्यादेत तयार करण्याचे निर्देश दिले तसेच ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट मानके, जमीन मूल्य हस्तगत धोरणे आणि अखंड बहुविध वाहतूक एकत्रीकरण यांचा अवलंब करण्यावर भर दिला. पुढे, बीकेसी व बोईसर उच्चगती रेल्वे स्थानकांनाही या अनुभवांचा विस्तार करून ही स्थानके मुंबई महानगर प्रदेशातील प्रमुख विकास केंद्रे म्हणून विकसित करण्याचे निर्देश दिले.
“हा उपक्रम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक मानकांनुसार विकसित, शाश्वत व परिवहन-केंद्रित विकासाचे अग्रगण्य केंद्र म्हणून घडविण्याच्या दृढ वचनबद्धतेला अधिक बळकटी देणारा आहे.”







