मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागील काही दिवसापासून सातत्याने मालेगाव मध्ये वाद सुरू आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेत असलेल्या समाजवादी पक्षाच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या कार्यालयामध्ये टिपू सुलतान चा फोटो लावला होता. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर तो काढून घेण्यात आला मात्र काही दिवसानंतर तो परत लावला यावरून वाद सुरूच आहे. तर दुसरीकडे मालेगावच्या महानगरपालिका कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या कक्षामध्ये ते नसताना काही जणांनी नमाजाची वेळ झाल्याने कार्यालयामध्येच सार्वजनिक नमाज पठण केले यामुळे चांगलीच खळब उडाली.
यावर उत्तर म्हणून भाजपच्या वतीने मालेगाव महानगरपालिका कार्यालयामध्ये हनुमान चालीसा पठण करण्यात आले. या सर्व प्रकारावर भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी संबंधितांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.
दरम्यान, महापालिकेतील विद्युत विभागातील कर्मचारी फिर्यादी महेंद्र रघुनाथ सावंत (वय ४३) हे वायरमन असून त्यांच्या फिर्यादीवरुन लुकमान, सलीम इक्का यांच्यासह आणखी चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक उपद्रव केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भातीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १३२, १८९(२), १९० आणि २९२ (सरकारी सेवकावर हल्ला, बेकायदेशीर सभा आणि संबंधित तरतुदी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१), ३७ (३) चे कमल १३५ अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.







