मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देखभाल दुरुस्ती करुन गाड्या रात्रंदिवस कार्यरत ठेवण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असते. याच कारणामुळे रेल्वे अनेकदा सुटीच्या दिवशी किंवा सुटीच्या आदल्या रात्रीपासून देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेते. आता रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती घेण्यात येणार आहेत. सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे या दोन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक
मुख्य मार्ग (CSMT – विद्याविहार) स्लो
सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ दरम्यान CSMT ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल.
सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाउन धीम्या गाड्या विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबतील.
घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप स्लो सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला ते भायखळा दरम्यानच्या स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्ग (कुर्ला – वाशी)
सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत अप आणि डाउन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल.
सीएसएमटीहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्याडाउन हार्बर मार्गावरील काही गाड्या रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी १५.४७ पर्यंत सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील काही सेवाही रद्द करण्यात येणार आहेत.
ब्लॉकदरम्यान सीएसएमटी–कुर्ला आणि पनवेल–वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. हार्बर प्रवाशांना ठाणे–वाशी/नेरुळ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉक
रविवार, १ मार्च रोजी वेस्टर्न रेल्वे कडून चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप व डाउन स्लो मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
स्लो मार्गावरील गाड्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान फास्ट मार्गावर चालवण्यात येतील. काही अप आणि डाउन उपनगरीय सेवा रद्द राहतील. चर्चगेटकडे जाणाऱ्या काही गाडयांना बांद्रा किंवा दादर हेच शेवटचे स्टेशन असेल. प्रभावित गाड्यांची माहिती संबंधित स्थानकांवर उपलब्ध असेल.
प्रवाशांना आवाहन
दोन्ही मार्गांवरील बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. देखभाल कामांमुळे काही गैरसोय होऊ शकते, मात्र सुरक्षित आणि सुरळीत सेवा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.







