मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी विजय मिळवत सेमी फायनलसाठी आपले आव्हान कायम ठेवले. हा विजय भारतासाठी महत्त्वाचा होता, कारण दोन्ही संघांसाठी 'करो या मरो; अशी परिस्थिती होती. परंतु भारताने आज आपल्या लौकिकेला साजेसा खेळ करत जगाला ताकद दाखवून दिली. या सामन्यामध्ये भारताने २० ओव्हरमध्ये २५६-४ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वे संघानेही चांगली झुंज देत २० ओव्हरमध्ये १८४-६ धावा केल्या. या सगळ्यामध्ये २२ वर्षाच्या युवा खेळाडूने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पठ्ठ्याने भारताविरुद्ध खेळताना नाबाद ९७ धावांची खेळी करत शेवटपर्यंत टिकून राहिला होता. अवघ्या तीन धावांनी त्याचे शतक हुकले, नेमका कोण आहे ब्रायन बेनेट त्याच्याविषयी माहिती जाणून घ्या.
झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेट याचा जन्म १० नोव्हेंबर २००३ साली हरारे येथे झाला होता. युवा प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये ब्रायनचा समावेश होतो. त्याचा जुळा भाऊ सुद्धा क्रिकेटर आहे. ब्रायन याचे वडील केली बेनेट हे शेतकरी आहेत. आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी त्यांनी ब्रायनला पीटर हाऊस बॉईज स्कूलमध्ये त्यांनी त्याला ठेवले होते. ही शाळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होण्यासाठी महत्त्वाची शिडी असल्यासारखी आहे. कारण या शाळेमधून अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर घडले आहेत.
ब्रायन हा २०२२ साली अंडर १९ वर्ल्ड कप मध्ये झिम्बाब्वे संघाचा उपकर्णधार होता. सहा सामन्यांमध्ये ४५ च्या सरासरीने २७३ धावा त्यांनी बनवल्या, ज्यामध्ये तीन अर्धशतक होते. त्यानंतर त्याने २०२२ मध्येच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर एक एक यशाची शिडी चढत गेला आणि आज वर्ल्ड कप मध्ये पोराने इतिहास रचला. भारताविरूद्ध त्याने ५९ बॉलमध्ये ९७ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली. इतकंच नाहीतर आणखी एक खास रेकॉर्ड म्हणजे गडी या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आऊटच झाला नाही. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये ५ सामन्यात २७७ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.
दरम्यान, भारताविरूद्ध टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताविरूद्ध वैयक्तिक सर्वाधिक धावांची खेळी करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी ख्रिस गेलने ९८ धावा भारताविरूद्ध २०१० साली केल्या आहेत.
भारत वि. झिम्बाब्वे दोन्ही संघांची प्लेइंग ११
संजू सॅमसन (WK), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (C), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
तादिवानाशे मारुमणी (WK), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (C), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नागरावा.







