Friday, February 27, 2026

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान, बिबट्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि सॅटेलाईट प्रणालीचा वापर करून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती सरकारने दिली.

राज्यात बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधील शिरकाव ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे ४२० नागरिकांना या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत. शिरूरमधील चिमुरडी आणि वृद्ध महिलेच्या मृत्यूच्या घटनेचा संदर्भ देत सभागृहात सदस्यांनी चिंता व्यक्त केली. केवळ २५ लाख रुपयांची मदत देऊन गेलेला जीव परत येणार नाही, त्यामुळे प्रशासनाने हल्ले होऊच नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांसह सर्वच सदस्यांनी केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार बिबट्यांचे 'लोकेशन' ट्रॅकिंग

या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले की, आता बिबट्यांचे अचूक स्थान (Location) शोधण्यासाठी 'एआय' आणि उपग्रह प्रणालीची मदत घेतली जाईल. बिबट्यांचा वावर असलेल्या क्षेत्रातील माहिती रिअल-टाइममध्ये नागरिक आणि स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवली जाईल. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना सावध राहणे शक्य होईल. याव्यतिरिक्त, ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर जास्त आहे, अशा संवेदनशील भागात 'चेन फेन्सिंग' किंवा 'जाळ्यांचे कुंपण' बसवण्याबाबतही सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

अहिल्यानगरसह ऊस उत्पादक पट्ट्यासाठी विशेष योजना

अहिल्यानगर (अहमदनगर) सारख्या जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने तिथे बिबट्यांनी आपला अधिवास निर्माण केला आहे. उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले सापडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बिबट्या नियंत्रणासाठी जे प्रकल्प यशस्वी झाले आहेत, ते महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याची सूचना सभागृहात करण्यात आली. या कामासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा