अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत इंग्लंडने न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या तर इंग्लंडने १९.३ षटकांत ६ बाद १६१ धावा केल्या.


इंग्लंडकडून विल जॅक्स आणि रेहान अहमद या जोडीने १६ चेंडूत ४४ धावांची नाबाद भागीदारी केली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. याआधी हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल या जोडीने ३५ चेंडूत ४८ धावांची तर टॉम बँटन आणि सॅम करन या जोडीने ३५ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. या तीन भागीदारींमुळे इंग्लंडच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. इंग्लंडच्या विल जॅक्सने १८ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकार मारत नाबाद ३२ धावा केल्या. तो सामनावीर झाला.


इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानच्या आशा कायम


इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८ मधील अपराजित मालिका कायम राखली. इंग्लंडने न्यूझीलंडचा अखेरच्या षटकात पराभव करत रोमांचक विजय मिळवून ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. आता त्यांच्यासमोर भारत किंवा वेस्ट इंडिज यांच्यापैकी एक स्पर्धक मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. न्यूझीलंडने शेवटच्या षटकापर्यंत हा सामना नेताना आपला नेट रन रेट चांगलाच ठेवला.


न्यूझीलंडने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खूप खराब झाली. दोन षटकांत संघाने दोन विकेट्स गमावले. जोस बटलरची बॅट याही सामन्यात रुसलेली दिसली आणि तो भोपळ्यावर बाद झाला. त्याआधी मॅट हेन्रीने पहिल्या षटकात फिल सॉल्टला ( २) बाद केले. इंग्लंडने दोन धावेवर दोन्ही फलंदाज गमावले. फॉर्मात असलेल्या हॅरी ब्रूकच्या सोबतीला जेकब बेथेल उभा राहिला आणि सहा षटकांत इंग्लंडने २ बाद ४७ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने आठव्या षटकात ब्रूकला ( २६) माघारी पाठवून किवींना मोठे यश मिळवून दिले. बेथेलही ( २१) रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. इंग्लंडने ५८ धावांत ४ फलंदाज गमावले आणि आता त्यांचा खेळ थोडा संथ झाला. सॅम कुरन व टॉम बँटन हे मैदानावर उभे राहिले तेव्हा इंग्लंडला ३६ चेंडूंत ६३ धावांची आवश्यकता होती. रविंद्रच्या गोलंदाजीवर कुरन ( २४) माघारी परतला. टॉम बँटनच्या ( ३३) विकेटनंतर इंग्लंडला १८ चेंडूंत ४३ धावांची गरज होती आणि १८व्या षटकात ग्लेन फिलिप्सला रेहान अहमद व विल जॅक्स यांनी मिळून २२ धावा कुटल्या, तर १९व्या षटकात १६ धावा कुटल्या आणि न्यूझीलंडला विजयापासून दूर नेले. जॅक्सने १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह नाबाद ३२ धावा केल्या, रेहानने ७ चेंडूंत नाबाद १९ धावा चोपताना इंग्लंडला १९.३ षटकांत ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विल जॅक्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.


न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु त्यांना सन्मानजनक धावसंख्या उभारता आल्या नाही. जोफ्रा आर्चरने सुरुवातीच्या षटकांत न्यूझीलंडच्या सलामीवीरांना संघर्ष करण्यास भाग पाडले. पण, टीम सेइफर्ट व फिन अॅलन यांनी सेट होत हात मोकळे करण्यास सुरुवात केली. ७व्या षटकात आदिल रशीदने किवींना पहिला धक्का दिला. २५ चेंडूंत ३५ धावा करणारा सेइफर्ट यष्टीचीत झाला. त्यानंतर विल जॅक्सला आडवा पट्टा मारण्याच्या प्रयत्नात फिन ( २९) झेलबाद झाला.


रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरलाच होता, परंतु रेहान अहमदने वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर गुगली टाकली आणि रचिनला ( ११) झेलबाद केले. ग्लेन फिलिप्सनेही २८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३९ धावांची खेळी केली आणि जॅक्सने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर किवींच्या पटापट विकेट्स पडल्या. राशीद व डॉसन यांनी धक्के दिले. त्यांना ७ बाद १५९ धावा करता आल्या. रशीद, जॅक्स व रेहान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Comments
Add Comment

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध जोरदार पुनरागमन करणार ?

मुंबई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात पुन्हा एकदा संथ सुरुवात झाल्यानंतर, मुंबई इंडियन्स आता आपल्या परिचित आणि

IPL 2026 Points Table : १५ सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स टॉपवर; हे ४ संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आघाडीवर

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ सामने पूर्ण झाले असून स्पर्धा आता रंगात आली आहे. काही संघ जबरदस्त

IPL 2026 Wanindu Hasaranga : लखनऊची डोकेदुखी वाढली! स्टार स्पिनर हसरंगा उर्वरित स्पर्धेतून बाहेर

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,