पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी युद्धाची घोषणा केली. दरम्यान, तालिबानने दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानचे अमेरिकन बनावटीचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले आहे. अफगाणिस्तानने सोशल मीडियावर जळत असलेल्या एफ-१६ विमानाच्या अवशेषांचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विमानाच्या मागील भागावर लहान पाकिस्तानी ध्वज दिसत असून त्यावर ‘८५५१०’ हा क्रमांकही स्पष्टपणे लिहिलेला आहे. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
गेल्या काही वर्षांत भारतीय वायुसेनेने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या हवाई चकमकींमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक पाकिस्तानी एफ-१६ विमाने पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. काही विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानच्या शस्त्रसाठ्यातील महत्त्वाचा घटक मानले जाणारे एफ-१६ लढाऊ विमान प्रत्यक्षात तितकेसे प्रभावी नाही.
View this post on Instagram
हा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा पाकिस्तानने काबुल आणि कंधार येथे हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांविरुद्ध ‘ऑपरेशन गजब-लिल-हक’ सुरू केल्याचा दावा केला असून, या कारवाईत १३३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यांनंतर अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली आहे. अफगाण सैनिकांनी सीमेजवळील हल्ले तीव्र केले आहेत.
पाकिस्तानचे म्हणणे आहे की, अफगाण दलांनी पाकिस्तानी सीमारक्षकांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात गुरुवारी (२६ फेबुवारी) रात्री हे हवाई हल्ले करण्यात आले. तालिबान सरकारने या कारवाईला यापूर्वी झालेल्या घातक हवाई हल्ल्यांचा बदला असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने आरोप केला आहे की, पाकिस्तानमध्ये हल्ले करणाऱ्या दहशतवादी गटांविरुद्ध अफगाणिस्तानने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही; मात्र तालिबान सरकारने हा आरोप फेटाळून लावला आहे.







