नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतरही, आरोपींनी २१ फेब्रुवारीला गणिताचा पेपर फोडल्याचे पुढे आले आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ शिवलिंग पटवे यांनी याला दुजोरा दिला आहे. शिक्षण मंडळ पोलिसांशी समन्वय साधून असल्याचे डॉ शिवलिंग पटवे यांनी सांगितले.
पेपर फोडल्याचे डिजिटल पुरावे समोर :
दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केला होता, पोलिसांनी तो डेटा रिकव्हर केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. १८ तारखेला हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला, तरीही २१ फेब्रुवारीला गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा सुद्धा पेपर फोडल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
पेपरफुटीचे रॅकेट ?
दुसरीकडे, पाच सदस्यीय विशेष तपास पथककडून पेपर फुटी संदर्भात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. रसायन, भौतिकसोबत गणिताचाही पेपर फुटल्याने पेपरफुटीचे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आरोपी गजाआड :
पेपरफूट प्रकरणी पोलिसांनी (२३ फेब्रुवारी) सोमवारी आणखी २ आरोपींना अटक केली. जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद (रा. हसनबाग) आणि मुस्तफा खान (रा. भानखेडा) अशा या आरोपींची नावे असून हे दोघेही ट्यूशन क्लास संचालक आहेत.
यापूर्वी पोलिसांनी निशिकांत सुखदेव मून आणि फरहान अख्तर फहीम अख्तर यांना अटक केली होती. नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या मुलीच्या मोबाईलवरून १६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याच समोर आले होते. या प्रकरणात शिक्षक निशिकांत मून, एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान, जुनेद जावेद अटकेत आहे.







