Thursday, February 26, 2026

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची अशी झाली निवड

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची अशी झाली निवड

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनस महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गुरुवारी एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. उपस्थित सर्व नेत्यांनी हात उंचावून आणि टाळ्यांच्या कडकडाटात या प्रस्तावाला संमती दिली.

मुंबईत पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, पार्थ पवार यांच्यासह देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना प्रफुल्ल पटेल भावूक झाले. ते म्हणाले, "अजितदादा वेगळ्या मातीचे बनले होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि पक्षाला राष्ट्रीय ओळख मिळवून दिली. २८ जानेवारीचा तो दिवस आपल्या सर्वांसाठी धक्कादायक होता. दादा आपल्यातून निघून गेले, पण त्यांनी शिकवलेला लढा आणि त्यांचा निश्चय आपल्याला पुढे न्यायचा आहे. आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अधिक जोमाने काम करेल," असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.

मागच्या काही दिवसांत पक्षांतर्गत घडामोडींवरून टीका करणाऱ्यांनाही पटेल यांनी प्रत्युत्तर दिले. "काही लोक पोटात एक आणि ओठात एक ठेवून बोलत होते. मात्र, आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून आम्ही आमची दिशा स्पष्ट केली होती. आता त्या पक्षाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत," असे पटेल म्हणाले.

बैठकीत काय घडले?

प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सर्व प्रांतांतील प्रतिनिधींनी त्याला पाठिंबा दिला. या बैठकीत पार्थ पवार यांच्याकडेही लवकरच मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आता नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

अजितदादांनी माझ्यावर विश्वास टाकून मला कार्याध्यक्ष केले होते. आज त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. सुनेत्रा पवार या सक्षमपणे ही जबाबदारी पेलतील. - प्रफुल्ल पटेल, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Comments
Add Comment