मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत रेल्वे स्थानके ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून दोन दिशेला असलेली शेवटची रेल्वे स्थानके आहेत. पनवेल हे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. तर, कर्जत हे मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे. त्यामुळे एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात जायचे असेल तर आधी ठाणे स्थानकात येऊन ट्रान्स हार्बर मार्गाने पुढे जावे लागते. परंतु आता नवीन कॉरिडोरमुळे पनवेल आणि कर्जतच्या मध्ये थेट लोकल रेल्वे केनक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पा अंतर्गत मुंबई रेल विकास महामंडळ हे पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोरची निर्मिती करत आहे.
या कॉरिडोरवर एकूण पाच स्थानके असणार आहेत. पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि पनवेल अशी स्थानके असतील. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा या प्रकल्पाअंतर्गत तयार केला जात आहे. या नव्या रेल्वे मार्गावर तीन बोगदे तयार करणार असून, तिन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा स्थानका दरम्यान सध्या १.६ किमी पारसिक बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे. मात्र पनवेल - कर्जतदरम्यानच्या वावर्ले येथील २.६ किमी लांबीचा बोगदा उभारला आहे. वावर्ले येथील बोगदा सर्वाधिक लांबीचा आहे. या बोगद्यात अनेक नवीन तंत्रज्ञानाचा आणि खडी नसलेला क्राँक्रिटचा ट्रॅक बनवण्यात येत आहे. आधुनिक स्काडा सिस्टीम यात लावली आहे.
प्रवाशांसाठी मोठा फायदा, प्रवासात ३० मिनिटांची बचत
कर्जत ते सीएसएमटी प्रवासासाठी सध्या किती वेळ लागतो?
जलद लोकल : सुमारे २ तास
धीमी लोकल : २.५ तास
नव्या दुहेरी मार्गामुळे पनवेलमार्गे प्रवास करताना साधारण १ तास ४५ मिनिटे लागतात त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
पनवेल-कर्जत लोकल ट्रेनची वैशिष्ट्ये
२९.६ किमी लांबीचा दुहेरी प्रकल्प, ८५ टक्के काम पूर्ण
कोरोना काळातील अडथळ्यांनंतर कामाला पुन्हा गती
एकूण ३,२०६ मीटरपेक्षा जास्त लांबीचे तीन बोगदे (नाधल २३४ मीटर, किरावली ३३३ मीटर आणि वावरले २,६३९ मीटर)
४७ पूल (मुख्य, लघु, जलवाहिनी, मध्यभाग एफओबी, सबवे)
पनवेल आणि कर्जत जंक्शनवर दोन रेल्वे उड्डाणपूल
वाहनांच्या सुरळीत संपर्कासाठी पाच रोड-ओव्हर ब्रिज
पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाच्या अंडरपाससह १५ रोड-अंडरब्रिज
प्रवासी सुविधांसह पाच आधुनिक स्थानके
ऑपरेशनल सुरक्षेसाठी प्रगत सिग्नलिंग आणि इंटरलॉकिंग सिस्टम्स
उर्वरित १५ टक्के काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे MRVCचे नियोजन







