पालघर : राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही नववा क्रमांक पटकावत सलग दुसऱ्या वर्षी आपले स्थान कायम राखले आहे. सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे, प्रशासनात पारदर्शकता वाढवणे आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे या निकषांवर पालिकेचे मूल्यमापन करण्यात आले. पुणे येथील पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन (पीआरओ) या संस्थेने राज्यातील २९ महानगरपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक तपासला. सेवा उपलब्धता, प्रशासनातील पारदर्शकता, संकेतस्थळाची उपलब्धता, मोबाईल अॅप, तसेच समाजमाध्यमांचा वापर अशा विविध बाबींचा या सर्वेक्षणात समावेश होता. या सर्व निकषांवर वसई–विरार महानगरपालिकेने ६.४४ गुण मिळवत नववे स्थान मिळवले आहे. पालिकेने ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करत स्वतःचे स्वतंत्र संकेतस्थळ, मोबाईल अॅप आणि समाजमाध्यमांवरील अधिकृत खाती कार्यान्वित केली आहेत. यामुळे नागरिकांना काही मिनिटांत माहिती मिळणे, तक्रारी नोंदवणे, करभरणा करणे तसेच विविध नागरी सेवांचा लाभ घेणे सुलभ झाले आहे. कोरोना काळानंतर ऑनलाइन सेवा वितरणाचे महत्त्व वाढले असून, शासनाने ई-गव्हर्नन्सला आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक मानले आहे. विशेष म्हणजे, संकेतस्थळाचा वापर, समाजमाध्यमांवरील सक्रियता आणि पारदर्शकता या विभागांत वसई–विरार महानगरपालिकेला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. सलग दोन वर्षे नवव्या क्रमांकावर कायम राहिल्याने पालिकेच्या डिजिटल प्रशासनाची दखल घेतली जात असून, आगामी काळात या क्रमांकात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







