Wednesday, February 25, 2026

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनी अजित पवार यांच्या वक्तशीरपणा आणि हजरजबाबीपणासह काम करण्याची कार्यपध्दतीमुळे लोकांना आपलासा वाटणारा नेता कसा असावा अशा शब्दांत त्यांच्या कामाच्या पध्दतीचे कौतूक केले. विशेष म्हणजे अजित दादा हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा होते अशाप्रकारच्या भावना सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त केल्या.

मुंबई महापालिकेच्या पहिल्या वहिल्या सभेची सुरुवात शोक प्रस्तावाद्वारे झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेल्या मृत्यूबाबत शोक प्रस्ताव मांडत श्रध्दांजली मांडताना सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रशासनावर उत्तम पकड असणारा असा नेता अशा शब्दांत त्यांच्या कामाचे वर्णन केले. वक्तशीरपणा कसा असावा हे अजित पवार यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते,असे सांगत खणकर यांनी हाच वक्तशीरपणा पाळण्यासाठी ते आपल्यातून निघून गेले अशा शब्दांत शोक व्यक्त केला. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अजित दादांना तीन वेळा भेटण्याचा अनुभव आल्याचे सांगत ज्या दिवशी ते महापालिकेत हेरिटेज वॉकसाठी आले होते, पाच वर्षांनी त्याच दिवशी त्यांचे विमान अपघातात निधन झाले. दादा माणूस कसा असला पाहिजे हे अजित दादांच्या कार्यपध्दतीवरून लक्षात येते. त्यांच्यामुळेच राज्याचा आर्थिक कणा मजबूत असल्याचेही सांगत वय वाढले तरी चालेल, वयाने म्हातारे व्हा, पण विचार म्हातारे होवू देवू नका अशाप्रकारची शिकवण त्यांनी आपल्याला दिली असल्याचे सांगितले.

तर शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी ग्रामीण आणि शहरी विकासाचा समतोल राखणारा असे हे नेता होते, असे सांगत. एखाद्या छोट्यातील छोट्या पदाधिकाऱ्यासोबतही त्यांचा थेट संपर्क असायचा अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. माझ्या प्रभागातून ते जात असताना त्यांना रस्त्यावर बॅरेकेट्स दिसून आले. त्यावर त्यांनी स्वत: फोन करून याकडे लक्ष द्या नाहीतर अपघात होईल अशी कल्पना दिल्याची आठवण अमेय घोले यांनी सांगितले.

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी अजित पवार यांचा मृत्यूची बातमी एवढ्या भीषणपणे समोर येईल असे वाटले नव्हते. शब्दाचा पक्का आणि शब्दावर जबरदस्त पकड असलेला असा नेता आपल्यातून हिरावून घेतला आहे. दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असा विश्वास बाळगत काम करणारा असा नेता होता, अशा शब्दांत शोक व्यक्त केला.

दादा हे आधारस्तंभ नव्हते तर आधारवड होते अशा शब्दांत शिवसेना नगरसेविका यामिनी जाधव यांनी शोक व्यक्त करत त्यांनी दादांचे व्यक्तिमत्व हे संवेदनशीर आणि भावनिक होते आणि कुटुंबापेक्षा पक्षाला आणि पर्यायाने कार्यकर्त्यांनाच अधिक वेळ दिल्याचे सांगत त्यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या दिक्षा कारकर यांनी अजित दादा हे मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना आदेश देणारेच नव्हते तर सर्वसामान्यांना उपलब्ध होवून आदेश देत काम करणारेही होते अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. तर भाजपच्या राखी जाधव यांनी आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली वाढलो, त्यांची कार्यपध्दती न्याहाळण्याची आणि अनुभवण्याची संधी लाभल्याचे सांगत भावना व्यक्त केल्या. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित रावराणे यांनी मुंबईत आपला राष्ट्रवादी पक्ष का वाढत नाही याबाबत दादा कायमच खंत व्यक्त करत असल्याची आठवण सांगत एका फोनवर कोकणातील वैभववाडीतील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सोडवण्याचा केलेल्या प्रयत्नांचीही आठवण करून देत शोक व्यक्त केला.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या डॉ सईदा खान यांच्या दादांवर बोलतांना अश्रु अनावर झाल्या होत्या. अश्रुंना वाट करत देत खान यांनी आम्ही तीन नगरसेविका मुंबईत निवडून आलो, पण आम्हाला दादांची भेट होवू शकली नाही अशा शब्दांत दु:ख व्यक्त केले. यावेळी झालेल्या सभेत श्रध्दा जाधव, अश्रफ आझमी, प्रकाश दरेकर, विशाखा राऊत, सचिन पडवळ, किरण लांडगे विजय उबाळे, दिपक कोतेकर, प्रकाश गंगाधरे, अंकित प्रभू आदींनी भाग घेत शोक व्यक्त केला. महापौरांच्या अनुपस्थितीमध्ये उपमहापौर संजय घाडी यांनी सभागृहाचे कामकाज पाहिले.

नवनाथ बन यांच्या भाषणाने गोंधळ

 

महापालिका सभागृहात शोक प्रस्तावावर भाषण करताना भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी धाराशीवमधील २०१९च्या निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या सभेत पातळी सोडून कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात होत्या, त्यावर अजित पवार यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असून ते कोणा एका पक्षाचे नसून देशाचे पंतप्रधान असल्याचे सांगितले आणि आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचले, तर दुसरीकडे अशाप्रकारे देशाचे गृहमंत्र्यांना ऍनाकोंडा म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना अशी समज देता आलेली नाही, त्यामुळे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही झापणारा आणि समज देणारा असा हा नेता होता,असे आठवण सांगण्याचा प्रयत्न बन यांनी करताच उबाठाच्या नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बन हे शोक प्रस्तावावर बोलतांत की राजकीय सभेत बोलतात असा प्रश्न उपस्थित झाला होता. शोक प्रस्तावावर बोलतांना शांत आणि संयमी आवाजात बोलणे आवश्यक असताना बन यांनी आपल्या आक्रमक स्टाईलमध्ये भाषण केल्यामुळे उपस्थित नगरसेवकांमध्ये कुजबूज सुरु झाली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >