मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत गांभीर्याने चर्चा झाली. शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी वांद्रे पूर्व येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे काम करताना प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे (Dust Mitigation Norms) उल्लंघन होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
पंकजा मुंडे यांचे उत्तर: 'चुकीची आकडेवारी पसरवू नका'
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, मुंबईत सध्या मेट्रो आणि विविध इमारतींची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात डेब्रिज (बांधकाम कचरा) निर्माण होत आहे. येत्या ३ ते ६ महिन्यांत डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी बैठक घेऊन एक ठोस प्लॅन तयार केला जाईल. त्यांनी नमूद केले की, काही लोक विकासाला विरोध करण्यासाठी प्रदूषणाची चुकीची आकडेवारी सादर करत आहेत. नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी MPCB ची अधिकृत आकडेवारी पाहावी. भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांनी सांगितले की, "मी स्वतः कोस्टल हायवेवरून जात असताना धुळीचे लोट पाहिले आणि तिथे तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत."
या चर्चेत हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेला (BMC) IoT (Internet of Things) आणि AI (Artificial Intelligence) वर आधारित 'डायनॅमिक मॉनिटरिंग सिस्टीम' तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत मानवी हस्तक्षेपाऐवजी तंत्रज्ञानाचा वापर होत नाही, तोपर्यंत बांधकामांच्या ठिकाणचे १०० टक्के मॉनिटरिंग शक्य नाही. सरकारी असो वा खाजगी, प्रत्येक बांधकामावर या सिस्टीमद्वारे लक्ष ठेवले जाईल.







