कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार
ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव
दक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी केला होता पाठपुरावा
मुंबई : राज्याचे कौशल्य विकास तथा मुंबईचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
ब्रिटिशांच्या खुणा सांगणाऱ्या या पुलाचे नाव मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. हे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी सातत्याने मुंबई महापालिकेकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मागणीला मान्यता देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान केला आहे.
मोडकळीला आलेल्या या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन या पुलाचे उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार भारताच्या वसाहतकालीन भूतकाळाची आठवण करून देणाऱ्या पाऊलखुणा पुसून भारतीयत्वाचा सन्मान करणारे आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये महानगरपालिकेने मुंबईतील जुना कोर्नॅक पूल ‘सिंदूर ब्रिज’ असे नामांतरित केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरार्थ राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले होते, अशी माहिती ही मंत्री लोढा यांनी दिली. दरम्यान, कौशल्य विभागानेही राज्यातील सर्व आयटीआयला थोर संत आणि महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय आधीच घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.







