नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली पोलिसांनी युवा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानु चिब यांना अटक केली आहे. या प्रकरणातील ही आठवी अटक आहे. दिल्ली पोलिसांनी इंडियन यूथ काँग्रेसचे दिल्ली अध्यक्ष उदय भानु चिब यांना सोमवारी (२३ फेब्रुवारी) चौकशीसाठी बोलावले होते.
याआधी सोमवारीच आणखी तीन आरोपी; जितेंद्र यादव, राजा गुर्जर आणि अजय कुमार यांना ग्वाल्हेर येथून अटक करण्यात आली होती. तर आंदोलनाच्या दिवशी युवा काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध तिलक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नवी दिल्ली जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात व्यापक कटकारस्थानाच्या दृष्टीने तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, युवा काँग्रेसचे कार्यकर्ते शुक्रवारी हॉल क्रमांक ५ च्या लॉबी परिसरात घुसले आणि आपल्या शर्टखाली घातलेल्या टी-शर्ट काढून किंवा हातात धरून घोषणाबाजी करू लागले.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळवण्यासाठी क्यूआर कोड घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. सुरुवातीला काळ्या रंगाच्या छत्र्यांवर स्टिकर लावून त्या भारत मंडपममध्ये गुपचूप नेण्याची योजना आखली होती. मात्र प्रवेशद्वारावर तैनात सुरक्षारक्षकांचे लक्ष वेधले जाईल, अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांनी योजना बदलली आणि स्टिकर असलेले टी-शर्ट शर्टखाली परिधान केले. सूत्रांच्या दाव्यानुसार, आंदोलनकर्त्यांनी ड्युटीवर असलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांशी झटापटही केली. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, आंदोलनामागील आर्थिक व्यवहारांचाही तपास केला जात आहे.
दरम्यान दिल्ली पोलिसांनी आरोपी व युवा काँग्रेस नेते कृष्ण हरि यांच्या गाडीतून २२ फेब्रुवारी रोजी टी-शर्ट जप्त केले. त्या वाहनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांसह टी-शर्ट आणि पोस्टरही सापडले. आंदोलनात दहा पेक्षा अधिक कार्यकर्ते हातात पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घेऊन सहभागी झाले होते. त्या टी-शर्टवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र छापलेले होते.
यापूर्वीच या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली होती. बिहारमधील युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कृष्ण हरि, बिहारचे युवा राज्य सचिव कुंदन यादव, उत्तर प्रदेशचे युवा राज्याध्यक्ष अजय कुमार आणि तेलंगणातील नरसिंहा यादव यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व आंदोलनकर्त्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. दक्षिणी रेंजचे संयुक्त पोलीस आयुक्त एस. के. जैन यांची एसआयटी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात विविध जिल्ह्यांचे पोलीस उपायुक्तही सहभागी आहेत. नवी दिल्ली जिल्ह्याच्या पथकांव्यतिरिक्त स्पेशल सेल आणि इतर पथकेही तपास करीत आहेत.







