Tuesday, February 24, 2026

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन

नाशिक :  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने उद्योजक आणि इनोव्हेटर्स तसेच स्टार्ट अप्स यांनी नाशिक शहरातील पर्यावरण, आरोग्य, शिक्षणासह विविध सामाजिक घटकांशी संबंधित सेवांमध्ये सहभाग द्यावा. जेणेकरुन या उद्योगांच्या वाढीसह सामाजिक विकासालाही हातभार लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. नाशिक जिल्हा प्रशासन, सीएसआर बॉक्स आणि कुंभथॉन इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह”चे आयोजन ताज गेटवे हॉटेल, नाशिक येथे करण्यात आले होते.

शाश्वत विकासासाठी नवकल्पना, भागीदारी व गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते. महाराष्ट्र राज्य इनोव्हेटीव सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, डिआयजीओचे ग्लोबल डायरेक्टर जेम्स आशल, सीएसआर बॉक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, यापूर्वी प्रयागराज येथे झालेला सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा यामध्ये मूलभूत फरक आहे. प्रयागराज येथील कुंभमेळा हा नदीकिनारी होता. येथील कुंभमेळा हा दोन शहरांमध्ये आणि मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे येथील आव्हाने भिन्न आहेत. येथे आलेल्या भाविकांना सुलभ वातावरण आणि सेवा उपलब्ध करुन देणे, यासाठी प्रशासनाचे प्राधान्य असणार आहे. अर्थात, यासाठी प्रशासनाला विविध घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यांच्या माध्यमातून पर्यावरण, नागरी सुविधा, आरोग्य, क्षेत्रातील सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

सध्या अनेक स्टार्ट अप्स हे विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि निर्मिती क्षेत्रातील आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची सेवा ही संधी आहे. या इनोव्हेटर्सच्या विविध संकल्पनांना बळ देणारी आणि सेवेबरोबरच उद्योजकता विकासासाठीचे पूरक वातावरण निर्मिती करणारी ही संधी आहे. दीर्घकालीन लवचिकता आणि समावेशक प्रगतीसाठी जिल्ह्याच्या वचनबद्धतेला बळकटी देणे, गोदावरी खोऱ्यातील जल व्यवस्थापन, हवामान-लवचिक शेती, एमएसएमई वाढ आणि प्रभाव-चलित गुंतवणूक यासारख्या स्केलेबल उपायांना गती देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी नवकल्पना व गुंतवणूक वाढीसाठी शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था व तज्ज्ञ यांच्या सहभागातून यावेळी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत नाशिक जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी नवकल्पना व गुंतवणूक वाढीसाठी धोरणात्मक चर्चा करण्यात आली. तसेच, शाश्वत विकासाशी संबंधित समस्यांचे व्यावसायिक व प्रभावी उपाय विकसित करण्यावर स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, तांत्रिक सल्ला, तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र इनोव्हेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष पाटील म्हणाले की, विविध भागातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना आर्थिक बळ देत त्या प्रत्यक्षात आणण्यास सोसायटीच्या माध्यमातून राज्य शासनाचे प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे जिल्हापातळीवरील अशा संकल्पनांना मूर्त रुप आणण्यासाठी आता मुंबईपर्यंत पाठपुरावा करावा लागू नये, जिल्हा पातळीवरील अडचणी त्याच पातळीवर सोडवल्या जाव्यात, अशा पद्धतीने इनोव्हेटीव सेलची स्थापना केली जाईल तसेच नाशिकमध्ये लवकरच सर्व प्राथमिकता पूर्ण करुन विभागीय पातळीवरील इनोव्हेटीव हब स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

आशल म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी आणि त्याअनुषंगाने विविध सामाजिक घटकांशी निगडीत उद्योग प्रवाहांना गती देण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम होत आहे. सामाजिक विषयांच्या बाबत चर्चा होते. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि उद्योजकांच्या सहकार्याने त्यासाठी आखणी केली जाते, ही निश्चितच चांगली आणि कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाह यांनी या गोदावरी इन्व्हेस्टमेंट आणि इम्पॅक्ट कॉन्क्लेव बाबतची माहिती दिली. शाश्वत विकासासाठी नवकल्पना, भागीदारी व गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेला. अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी शाश्वत विकासाशी संबंधित समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय सादर करण्यासाठी हॅकॅथॉन हा उपक्रम राबविला गेला. त्यातील अंतिम विजेत्यांना गौरविण्यात आले. स्टार्ट अप एक्स्पो अंतर्गत शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन, कृषी नवकल्पना, शहरी व्यवस्थापन व सार्वजनिक सेवा तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअप्सना त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्याची संधी दिली गेली. यामुळे उद्योग, गुंतवणूकदार आणि शासन यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी 30 हून अधिक स्टार्ट अप्सना मिळाली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रम स्थळ परिसरात विविध स्टार्ट अप्स आणि इनोवेटर यांच्या उत्पादन आणि संकल्पनांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मान्यवरांनी भेट दिली. या नाविन्यपूर्ण संकल्पनांची त्यांनी आवर्जून आणि आस्थेवाईकपणे माहिती घेतली आणि त्यांचे कौतुक केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा