मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मंडयांचा पुनर्विकास करताना कोळी महिलांना तळघरात जागा उपलब्ध करून दिली जात असून यामुळे कोळी महिला यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून पर्यायाने मासे खरेदीला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे मंडईच्या पुनर्विकासात मासे विक्रीसाठी इमारतीच्या तळमजल्यावरच आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी बाजारासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरुन, कोळी महिलांना मासे विक्री करणे आणि ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे होईल अशी मागणी भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी महापालिकेत केली आहे.
भाजप नगरसेविका योगिता कोई यांनी महापालिका सभागृहापुढे ठगावाच्या सूचनेद्वारे मागणी करताना असे म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या अनेक मंडयांचा पुनर्विकास सुरु असून, या पुनर्विकास प्रक्रियेत मासे विक्री करणाऱ्या कोळी महिलांना त्या मंडयांच्या तळघरामध्ये मासे विक्रीसाठी जागा ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. परंतु, तळघरात मासे विक्री करताना कोळी महिला आणि मासे खरेदी करणारे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रामुख्याने वयोवृद्ध कोळी महिलांना मासळीची टोपली आणि संबंधित सामान घेऊन तळघरात उतरणे त्रासदायक ठरते. तसेच, तळघरात पुरेशी खेळती हवा नसल्याने, मासळीचा वास पसरुन दुर्गधी पसरते. त्याचप्रमाणे, तेथे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने, वारंवार गटार तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी जमा होत असते. पावसाळ्यात तर तळघरात पाणी साचण्याचा धोका कायमच असतो.
मंडयांच्या तळघरामध्ये मासे विक्रीसाठी आवश्यक त्या स्वच्छतेच्या सुविधांचा नेहमीच अभाव दिसून येतो. परिणामी, नागरिक मंडयांच्या तळघरामध्ये मासे खरेदी करण्यासाठी येण्याचे टाळतात व याचा परिणाम कोळी महिलांच्या उपजीविकेवर होत आहे.
त्यामुळे महानगरपालिकेच्या मंडयांचा पुनर्विकास करताना कोळी महिलांना मासे विक्रीसाठी त्या इमारतीच्या तळमजल्यावरच आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी बाजार उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक नियमावली बनवण्यात यावी, असे नमूद केले आहे.







