Tuesday, February 24, 2026

राज्यात वर्षभरात दीड हजार ड्रग्ज तस्करांना बेड्या

राज्यात वर्षभरात दीड हजार ड्रग्ज तस्करांना बेड्या

मुंबई : राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे दिवसेंदिवस अधिक विस्तारत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या वर्षभरात (२०२५) राज्यात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १ हजार ४५४ जणांना अटक करण्यात आली असून, एकूण १५ हजार ४०८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक असून, २०२५ मध्ये अशा १३ हजार ९५४ व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात आले. याची सरासरी पाहिल्यास राज्यात दर महिन्याला अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १ हजार १६२ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अमली पदार्थांच्या सेवनाप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या १३ हजार ९५४ व्यक्तींपैकी ३ हजार २६८ जण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

वर्षभरात अमली पदार्थांच्या वाहतुकीवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. तस्करी आणि वाहतूक केल्याप्रकरणी ३ हजार ६५९ गुन्हे दाखल झाले असून, त्यात ५ हजार ३०७ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संपूर्ण कारवायांमध्ये राज्यात तब्बल १ हजार ३४० कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई 'ड्रग हब' होण्याच्या मार्गावर?

राज्याची राजधानी मुंबई अमली पदार्थांचे केंद्र (हब) बनत असल्याचे चित्र या आकडेवारीवरून दिसत आहे. १ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२६ या अवघ्या ४२ दिवसांच्या कालावधीत मुंबईत तस्करीचे ९३ गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी ११२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ कोटी ९३ लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

राज्यातील स्थिती (वर्ष २०२५)

- एकूण गुन्हे दाखल : १५,४०८ - अमली पदार्थ तस्करी (अटक) : १,४५४ - अमली पदार्थ सेवन (गुन्हे) : १३,९५४ - जप्त मुद्देमाल : १,३४० कोटी ४१ लाख रुपये - फरार आरोपी (सेवन प्रकरणी) : ३,२६८

Comments
Add Comment