Monday, February 23, 2026

महापालिकेत भाजपकडून छेडा,सिंह,कर्पे, दळवी, तर शिवसेनेकडून ब्रीद, सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी?

महापालिकेत भाजपकडून छेडा,सिंह,कर्पे, दळवी, तर शिवसेनेकडून ब्रीद, सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार असून या दहा जागांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या कोट्यानुसार उमेदवारांची नावे महापालिका आयुक्तांकडे सादर केली आहे. यामध्ये चार माजी नगरसेवकांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपकडून माजी विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा आणि माजी विरोधी पक्षनेते आणि विधान परिषद सदस्य राजहंस सिंह यांच्या पुत्राची अर्थात नितेश सिंह यांची वर्णी लावली जाणार आहे.

मुंबई महापालिकेत यापूर्वी पाच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जात होती, परंतु आता ही संख्या दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाच्या गणसंख्येनुसार भाजपच्या वाट्याला चार स्वीकृत नगरसेवक, तर उबाठा तीन, शिवसेना दोन आणि काँग्रेसच्या वाट्याला १ अशाप्रकारे स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक पक्षाच्यावतीने उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यासर्व अर्जांची छाननी करून बुधवारी होणाऱ्या महापालिका सभेपुढे नावे जाहीर करण्यात येणार आहे.

भाजपात कर्पे आणि दळवी यांची वर्णी

भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांच्या चार जागा येत असून त्यानुसार भाजपच्यावतीने माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, नितेश राजहंस सिंह, प्रतिक कर्पे आणि कमलाकर दळवी यांची वर्णी लावण्यात येत आहे. यासर्वांचे प्रस्ताव महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. एका बाजुला प्रवीण छेडा आणि नितेश राजहंस सिंह यांची वर्णी लावतानाच अभ्यासू असलेल्या भालचंद्र शिरसाट यांना स्थान देण्यात आले नाही. तर दुसरीकडे पक्षाशी एकनिष्ट असलेल्या कमलाकर दळवी आणि प्रतिक कर्पे यांना महापालिकेत यामाध्यमातून संधी देण्यात येत आहे.

शिवसेनेत उत्तर मुंबईलाच प्राधान्य

स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेच्यावतीने बाळकृष्ण ब्रीद आणि राज प्रकाश सुर्वे यांची वर्णी लावण्यात येत आहे. मात्र, यापैंकी कुणाचा अर्ज बाद झाल्यास उमेश माने यांच्या ही नावाचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वे हे मागाठाणे आणि दहिसर विधानसभेतील असून शिवसेनेने उत्तर मुंबईतील या दोनच विधानसभांमधील पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने उत्तर मुंबईलाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आह.

उबाठात दुर्गे, मांजरेकर आणि पाठक

उबाठाच्यावतीने स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीन उमेदवारांचे अर्ज महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आल्याची माहिती मिळत असून यामध्ये माजी शिक्षण समिती सदस्य तसेच उबाठाचे सचिव साईनाथ दुर्गे यांना संधी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक १७७चा प्रभाग मनसेला सोडण्यात आल्यानंतर उबाठाच्या माधुरी मांजरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पण पुढे त्यांनी मनसेच्या उमेदवाराचा प्रचार करत निवडणुकीत भाग घेतला होता. आता शिवसेनेचे अमेय घोले निवडून येत नगरसेवक बनल्यानंतर त्याठिकाणी आपल्या पक्षाचा दावा सक्षम राहावा यासाठी उबाठाने माधुरी मांजरेकर यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. याशिवाय उबाठाच्यावतीने जोगेश्वरीतील कैलास पाठक यांचीही वर्णी महापालिकेवर लावण्यात येत आहे.

काँग्रेसने मालाडलाच दिली संधी

काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा जात असल्याने काँग्रेसच्यावतीने यापूर्वी प्रभाग क्रमांक ३३मधून निवडून आलेले आणि आता आरक्षणामुळे उमेदवारी न मिळालेले विरेंद्र चौधरी यांची वर्णी लावण्यात येत आहे. विरेंद्र चौधरी हे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याचे बोलले जात आहे.

भाजपा :

प्रवीण छेड़ा

नितेश राजहंस सिंह

प्रतीप कर्पे

कमलाकर दळवी

शिवसेना :

बाळकृष्ण ब्रीद

राज सुर्वे

उमेश माने

उबाठा :

साईनाथ दुर्गे,

माधुरी मांजरेकर

कैलास पाठक

कांग्रेस :

वीरेंद्र चौधरी

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा