Monday, February 23, 2026

खंडाळा घाटात पुन्हा थरार! ज्वलनशील गॅस टँकर घसरला; काही काळ वाहतूक ठप्प

खंडाळा घाटात पुन्हा थरार! ज्वलनशील गॅस टँकर घसरला; काही काळ वाहतूक ठप्प

मुंबई : मागील महिन्यात मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर एका टँकरचा अपघात झाला होता, त्यातील ज्वलनशील प्रोपेलिन गॅसची गळती महामार्गावर झाली. आणि महामार्गावर तब्बल २ दिवस लोक वाहतूककोंडीत अडकून राहिली. आता पुन्हा एकदा ज्वलनशील गॅस वाहतूक करणारा टँकर घाटात अपघातग्रस्त झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे सावट पसरले होते.

घटना कुठे आणि कशी घडली?

खंडाळा घाट परिसरातील अमृतांजन पुलाजवळ सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. तीव्र उतार आणि वळण असलेल्या भागातून जाताना प्रोपेलिन गॅसने भरलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन दुभाजक ओलांडत रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन अडकले. टँकर उलटला नाही आणि गॅस गळती झाली नाही त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. खबरदारी म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. क्रेनच्या मदतीने टँकर सुरक्षितरित्या हटवण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

याच मार्गावर काही आठवड्यांपूर्वी गॅस टँकर अपघातानंतर दीर्घकाळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पुन्हा ही बातमी समजताच अनेकांच्या मनात वाहतूक कोंडीचे चित्र उभे राहिले. मात्र यावेळी प्रसंग लवकर नियंत्रणात आल्याने मोठे संकट टळले.

घाटातून होणाऱ्या या ज्वलनशील गॅस वायूंची वाहतूक आणि त्यांचे होणारे अपघात हे इतर लोकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. त्यामुळे या मार्गावर अतिरिक्त खबरदारी आणि कडक नियमांची गरज अधोरेखित होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >