मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा, गोरगरीब रुग्णांची सेवा, निवारा या सर्व सेवाकार्यांवर महत्वपूर्ण भर दिला असून गाडगे महाराजांचा हा जीवन संदेश सर्वांनी आचरणात आणणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले. संत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीचा कार्यक्रम सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात असलेल्या गाडगेबाबा धर्मशाळेत सोमवारी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.
महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मी त्यांच्या येथील कार्यक्रमामुळे प्रभावित झाले आहे.त्यासोबतच घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे स्वच्छतेचे बरेच उपक्रम आम्ही राबविणार असून नगरसेवकांसोबत या उपक्रमामध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळाल्यास स्वच्छतेमध्ये आपण उच्चांक गाठू, असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला. यापुढील काळात आपल्या संस्थेद्वारे आयोजित स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये मला सहभाग घ्यायला आवडेल,असेही महापौरांनी यावेळी सांगितले. यावेळी महापौरांच्या हस्ते रुग्णांना फळे व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. राजश्री कटके, गजाननराव नागे, संस्थेचे एकनाथ ठाकूर, उत्तमराव लोणारकर, अमोल ठाकूर, सत्यवान नर आदी उपस्थित होते.







