Amol Mitkari on Ajit Pawar : "माझे शेणाचे हात पेनाला लावणारे दादाच!"; अजितदादांच्या शोक प्रस्तावावर विधानसभेत मिटकरींच्या आठवणींना फुटला पाझर

मुंबई : विधान परिषदेत अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या राजकीय प्रवासातील दादांचे योगदान मांडले. कोणताही राजकीय वारसा नसताना एका सामान्य कार्यकर्त्याला थेट आमदारकीपर्यंत पोहोचवणारे 'अजितदादा' हेच माझे खरे मार्गदर्शक होते, अशा शब्दांत मिटकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अमोल मिटकरी म्हणाले की, "मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. माझ्याकडे कोणतीही मोठी पार्श्वभूमी नव्हती. पण अजितदादांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचारासाठी चक्क हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले." शेतीकामात व्यग्र असलेल्या एका सामान्य माणसाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून, 'शेणाचे हात पेनाला लावायला' लावण्याचे काम दादांनी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अजित पवारांच्या पारखी नजरेमुळेच आज मी या सभागृहात उभा आहे, असे सांगताना मिटकरी भावूक झाले. सामान्य माणसातील कर्तृत्व ओळखून त्याला संधी देणे ही दादांची कार्यशैली होती. त्यांनी केवळ मला आमदार केले नाही, तर एका सामान्य व्यक्तीचा सन्मान वाढवला, अशा आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.



अकोल्याचा वक्ता ते विधान परिषदेचा आमदार


एका व्याख्यात्याने थेट आमदारकीपर्यंत मारलेली मजल ही केवळ अजितदादांच्या विश्वासामुळे शक्य झाली, असे मिटकरी यांनी आवर्जून सांगितले. २०१९ साली बारामतीतील शारदा प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानावेळी ही भेट झाली. मिटकरी सांगतात, "मी एक साधा व्याख्याता होतो. माझ्या घरात कोणाला ग्रामपंचायतीचे सदस्यत्व काय असते, हेही माहीत नव्हते. पण त्या रविवारी दादांनी माझे नाव आणि विषय वाचला आणि मला विचारले, 'कुठे असता? काय करता?' मी त्यांना सांगितले की, मी महापुरुषांचे विचार मांडणारा अकोल्याचा एक सामान्य कार्यकर्ता आहे." मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्या एका वक्त्यातील ठिणगी अजितदादांनी ओळखली. "माझे शेणाचे हात पेनाला लावणारे आणि मला राजकारणात आणणारे दादाच होते," अशा शब्दांत मिटकरींनी कृतज्ञता व्यक्त केली. सामान्य कार्यकर्त्याला थेट सभागृहात पाठवण्याचे धाडस केवळ अजितदादाच दाखवू शकतात, असा सूर त्यांच्या भाषणातून उमटला.



दोन तासांचे व्याख्यान अन् दादांनी फिरवली गाडी


अजितदादांची पारखी नजर आणि वक्तृत्वाचा सन्मान कशा प्रकारे असायचा, याचा एक हृदयस्पर्शी अनुभव आमदार अमोल मिटकरी यांनी मांडला. एका साध्या व्याख्यात्याला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दादांनी घेतलेला पुढाकार आजही मिटकरींच्या स्मरणात आहे. २०१९ सालच्या बारामतीतील त्या घटनेची आठवण सांगताना मिटकरी म्हणाले, "दादा उद्घाटन करून निघून जाणार होते. पण संभाजी महाराजांचे चरित्र मी वेगळ्या पद्धतीने मांडतो, असे समजताच त्यांनी आपली गाडी वळवली आणि चक्क श्रोत्यांमध्ये जाऊन बसले. सलग २ तास १५ मिनिटे दादांनी माझे व्याख्यान शांतपणे ऐकले." एका मोठ्या नेत्याने सामान्य वक्त्यासाठी आपला वेळ देणे, ही दादांची वेगळी शैली होती. व्याख्यान संपल्यानंतर तीन महिन्यांनी थेट दादांच्या कार्यालयातून मिटकरींना फोन आला. "तुम्ही संभाजी महाराजांवर खूप चांगले बोललात, मुंबईला आलात तर नक्की भेटा," असा निरोप त्यांना मिळाला. मुंबईतील त्या भेटीत दादांनी थेट विचारले, "आमच्या पक्षात येणार का, काम करणार का?" त्यावर मिटकरींनी उत्तर दिले की, "माझा राजकारणाशी संबंध नाही, तुम्हाला भेटलो हेच माझे भाग्य." मात्र, दादांच्या त्या एका पारखी नजरेने एका चळवळीतील वक्त्याचे रूपांतर आमदारात केले.



"ते पोरगं लय फिरलंय, आमदार करेन तर त्यालाच!"


निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षासाठी जिवाचं रान करणाऱ्या एका कार्यकर्त्याला दादांनी कशा प्रकारे न्याय दिला, याचा उलगडा मिटकरींनी केला. मिटकरींच्या राजकीय प्रवेशावेळी जयंत पाटील यांनी त्यांना बुथ बांधणीच्या कामात लावण्याची सूचना केली होती. मात्र, अजितदादांनी मिश्कीलपणे हसत म्हटले, "हा बुथ बांधणीचा माणूस नाही, हा मैदान मारणारा गडी आहे, याला महाराष्ट्रभर फिरवूया." त्यानंतर 'शिवस्वराज्य यात्रे'च्या माध्यमातून मिटकरींनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. २०१९ च्या निवडणुकीत दादांनी त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि मिटकरींनी तब्बल ६८ सभा गाजवल्या. दौंडमधील एका पराभवाच्या मेळाव्यात जेव्हा कार्यकर्त्यांनी विधान परिषदेच्या जागेसाठी चर्चा सुरू केली, तेव्हा दादा सुरुवातीला चिडले. पण त्याच भरात त्यांच्या ओठावर मिटकरींचे नाव आले. "ते पोरगं (मिटकरी) खूप फिरलंय, पक्षासाठी त्याने जिवाचं रान केलंय, मी आमदार करेन तर त्यालाच करेन," असा शब्द दादांनी भर सभेत दिला. दादांनी उच्चारलेले हे शब्द टीव्हीवर बातमी म्हणून झळकले. त्यावेळी मिटकरी अमरावतीत एका कार्यक्रमात होते. आपल्या नावाचा असा विचार केला जाईल, याची कल्पनाही नसताना मिळालेल्या या सुखद धक्क्याने मिटकरी भारावून गेले. दादांनी दिलेला शब्द पाळला आणि एका सामान्य कार्यकर्त्याला थेट विधान परिषदेत मानाचे स्थान दिले, अशी कृतज्ञता मिटकरींनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

 हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणणार; लोकभावना लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई :

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली

Nalasopara Murder Case : धक्कादायक! ५ महिन्यांपासून बेपत्ता गँगस्टरचा अखेर उलगडा; ड्रेनेज चेंबरमधून सापडला मानवी सांगाडा

नालासोपारा :  गेल्या ५ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कुख्यात गँगस्टर रवि बिडलान (Ravi Bidlan Murder Case) प्रकरणात मोठा

Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांसाठी वह्या, स्टेशनरी आणि गणवेश खरेदीला मान्यता

शालेय साहित्य खरेदीला विलंब, मुलांना मिळणार उशिराने मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात