इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शना दरम्यान हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पालिस कर्मचार्यांचाही समावेश आहे. यापार्श्वभूमीवर आता इराणमधील भारतीय दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याची सूचना केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (२३ फेब्रुवारी) एक सूचना (अॅडव्हायजरी) जारी करून आपल्या नागरिकांना कोणत्याही मार्गाने तात्काळ इराणमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी १४ जानेवारीलाही मंत्रालयाने अशीच सूचना जारी करून सर्व नागरिकांना इराण सोडण्याचे आवाहन केले होते.
मंत्रालयाने सूचनेत इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास, आंदोलन किंवा निदर्शने होत असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्यास आणि भारतीय दूतावासाशी सतत संपर्कात राहण्यास सांगितले आहे.तसेच नागरिकांनी आपले प्रवास व स्थलांतरासंबंधी कागदपत्रे, जसे की पासपोर्ट आणि ओळखपत्र नेहमी सोबत ठेवावीत, असेही नमूद करण्यात आले आहे.
इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी भारतीय दूतावासात आपली नोंदणी करून घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच इराणमध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकांसाठी त्यांच्या कुटुंबीयांनाही दूतावासात नोंदणी करता येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी दूतावासाने खालील हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत:
+९८९१२८१०९११५, ९८९१२८१०९१०९, ९८९१२८१०९१०२, ९८९९३२१७९३५९
इराणमधील निदर्शनाची कारणे काय ?
इराणमधील सध्याची निदर्शने प्रामुख्याने प्रचंड महागाई, इराणी चलनात झालेली (रियाल) घसरण, अन्नाची टंचाई आणि ढासळलेली आर्थिक स्थिती यांमुळे उसळली आहेत. डिसेंबर २०२५ च्या अखेरीस बझारी (व्यापारी) वर्गाच्या संपाने सुरू झालेल्या या आंदोलनाने आता व्यापक स्वरूप धारण केले असून, लोक इस्लामी मूलतत्त्ववादी सरकारविरोधात आणि सत्तापालटाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.
इराणमधील निदर्शनाची प्रमुख कारणे:
आर्थिक संकट व महागाई: इराणच्या चलनात (रियाल) डॉलर्सच्या तुलनेत विक्रमी घसरण झाल्यामुळे आयात महागली आहे, परिणामी अन्नधान्य, खाद्यातेल, मांस आणि गहू यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.
व्यापाऱ्यांचा संप (बझारी): तेहरानच्या ऐतिहासिक ग्रँड बझारमधील व्यापाऱ्यांनी वाढत्या महागाईला कंटाळून दुकाने बंद केली आणि निषेध नोंदवला, ज्याला नंतर सर्वसामान्यांनी मोठा पाठिंबा दिला.
अन्न टंचाई व गरिबी: खाद्यान्नाच्या किमतींमधील प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत, ज्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे.
सरकारविरोधी भावना: ही निदर्शने आता केवळ आर्थिक मुद्द्यांपुरती मर्यादित नसून, इस्लामिक रिपब्लिकची सत्ता उलथून टाकण्याची मागणी आंदोलक करत आहेत.
दमनकारी धोरणे: सरकारी दडपशाही, इंटरनेट ब्लॅकआउट आणि कठोर सामाजिक निर्बंधांविरुद्ध लोकांमध्ये तीव्र राग आहे.
थोडक्यात, वाढती महागाई, उपासमार आणि राजकीय स्वातंत्र्याच्या अभावामुळे इराणमध्ये सलग अनेक महिने असंतोष धुमसत आहे.







