Sunday, February 22, 2026

जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त

जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये चतरू भागात सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. सुरक्षा पथकाने दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला तसेच 'जैश - ए - मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. आणखी काही दहशतवादी परिसरात लपले असल्यामुळे चकमक अद्याप सुरू आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना 'जैश - ए - मोहम्मद'चे किमान दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा यंत्रणेला दिली. ही माहिती मिळताच सुरक्षा पथकाने किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली. सुरक्षा पथकाने चतरू भागात शोध मोहीम हाती घेतली. जवान थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचणार याची जाणीव होताच दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा पथकाने प्रत्युत्तर दिले. चकमकीत 'जैश - ए - मोहम्मद'चे दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने चतरूमधील दहशतवाद्यांचा एक तळ उद्ध्वस्त केला. लपलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. याआधी ४ फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलांनी चतरू येथे जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला ठार मारले होते. तसेच उधमपूर जिल्ह्यात, एका गुहेत लपलेले जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ग्रेनेड स्फोटात मारले गेले.
Comments
Add Comment