जिद्द

कथा : रमेश तांबे


रस्त्याच्या कडेला एक शाळकरी मुलगा वजन काटा घेऊन बसला होता. काट्यावर दोन रुपये असा कागद लावला होता. मुलाच्या अंगावर शाळेचेच कपडे होते. मुलगा चुणचुणीत होता. तो कसलेसे पुस्तक वाचत होता. अधूनमधून काही लोक वजन करीत दोन रुपये देऊन निघून जात. हे दृश्य मी दूरवर उभा राहून बघत होतो. लोक वजन करायचे अन् डब्यात पैसे टाकायचे. हे सुरू असतानादेखील मुलाचे लक्ष मात्र पुस्तकातच होते. लोक पैसे देतात की नाही देत याकडे त्याचे लक्ष नव्हते. मला त्या मुलाचे कौतुक वाटले. आपणही जाऊन वजन करावे, दोन रुपये त्याच्या डब्यात टाकावे. त्यानिमित्ताने त्याच्याशी दोन गप्पा माराव्यात असे ठरवून मी त्या मुलाच्या जवळ गेलो.


त्याने फुटपाथवर एक छोटीशी सतरंजी अंथरली होती. त्यावर वजन काटा ठेवून बाजूला बसला होता. त्याच्या हातात भूगोलाचं पुस्तक होतं. ते तो मन लावून वाचत होता. मी त्याला विचारले, “काय रे मुला, काय वाचतोयस. एवढा तल्लीन झाला आहेस वाचनात?” तशी त्या मुलाची तंद्री भंग पावली. तो म्हणाला, “काका माझी परीक्षा सुरू आहे. पेपर संपला आणि थेट इकडेच आलो. वजन काटा दप्तरातच असतो माझ्या. उद्या माझा भूगोलाचा पेपर आहे” मला त्या मुलाची परिस्थिती जाणून घ्यायची होती. मी विचारले, “अरे परीक्षा सुरू असताना अभ्यास करायचा सोडून तू इथे वजन काटा घेऊन का बसलास?” तसा मुलगा म्हणाला, “काका मी गरीब कुटुंबातला मुलगा आहे. परीक्षेच्या काळात कामधंदा सोडून घरात बसणं परवडण्यासारखं नाही.” त्याचं हे उत्तर ऐकून मी चांगलाच भानावर आलो. मुलगा पुढे सांगू लागला, “मी आणि माझे बाबा आम्ही दोघेच आहोत. पाच वर्षांपूर्वीच माझी आई देवाघरी गेली. त्या पलीकडच्या झोपडपट्टीत आम्ही राहातो. बाबादेखील चणे-फुटाणे विकण्याचा धंदा करतात. तेच जेवण बनवतात. मी शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यावर वजन काटा घेऊन इथे बसतो. दिवसभरात साठ-सत्तर रुपये मिळतात. तेवढीच बाबांना मदत होते. आमच्या झोपडपट्टीत खूप गोंधळ असतो. त्यामुळे तिथे अभ्यासदेखील करता येत नाही. मग इथेच बसतो. अभ्यासही होतो आणि पैसेदेखील मिळतात.” मुलाच्या चेहऱ्यावर स्वकमाईचा, स्वाभिमानाचा आनंद ओसांडून वाहत होता. त्या मुलाची जिद्द, मेहनत, लहान वयात आलेली समज पाहून आश्चर्य वाटले आणि गरिबांची मुलं लवकर प्रौढ होतात या वाक्याची प्रचिती मला आली.


मग मी माझे वजन केले. दोन रुपये देण्याऐवजी शंभर रुपयाची नोट त्याला दिली, तर मुलगा म्हणाला, “काका माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत.” मी म्हणालो, “नको राहू दे. ठेव ते शंभर रुपये. तुझी परीक्षा सुरू आहे ना! मग उद्या इथे नाही आलास तरी चालेल. पण अभ्यास कर.” मग खिशातून एक कागद काढला. त्यावर माझा फोन नंबर लिहून दिला आणि म्हणालो, “बाळा काही लागलं तर फोन कर. मी तुला नक्कीच मदत करीन.”


आज या घटनेला दहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेला. पण त्या मुलाचा फोन कधीच आला नाही याचे मला खरोखरंच आश्चर्य वाटले. नाही तर पदोपदी आपल्याला लुबाडणारी मंडळी आपल्या आसपास असतात. पण या मुलाला मी स्वतःहून मदत देऊ केली होती. तरी त्याने ती घेतली नाही. पण त्याने मला फोन का केला नाही? हा प्रश्न माझ्या मनात अजूनही एक कोडं बनून राहिलेला आहे.
Comments
Add Comment

व्यक्तिमत्त्वात माधुर्य हवे

गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनात व्यक्तिमत्त्व आकर्षक असणे जितके

सहलीचा प्रवास

कथा; प्रा. देवबा पाटील श्रावण महिना सुरू झालेला होता. त्यामुळे दर श्रावण सोमवारला शिवमंदिरावर चांगली मोठी

नावात काय आहे...?

प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ एका अत्यंत नावाजलेल्या महत्त्वाच्या संस्थेत कार्यक्रमासाठी मी गेले होते. या

एका जिद्दी माणसाची गोष्ट

कथा;रमेश तांबे नमस्कार बालमित्रांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एका क्रिकेटपटूची. आपल्या भारत देशाच्या

विवेक

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ डेस्टिनेशन वेडिंग’साठी आम्ही जयपूरला गेलो होतो. तिथे एका लग्न समारंभात आम्ही

जीवनगाणे - अर्थपूर्ण जगण्याचा सुरेल प्रवास

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर जीवन हे एका सुंदर गाण्यासारखे असते. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे सूर, ताल,