Sunday, February 22, 2026

Mumbai-Nashik Local Train: मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरु होणार; रेल्वे मार्गाच्या विस्ताराला मंजुरी

Mumbai-Nashik Local Train: मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरु होणार; रेल्वे मार्गाच्या विस्ताराला मंजुरी

मुंबई: मुंबई आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार आता थेट नाशिकपर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

भाजपा नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या नवीन रेल्वे प्रकल्पामुळे मुंबई आणि नाशिकमधील कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच, पण दोन्ही औद्योगिक शहरांमधील आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

रेल्वे मार्गाच्या विस्ताराला मंजुरी

सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवा केवळ कसारा स्थानकापर्यंत मर्यादित आहे. परंतु, आता ही सेवा थेट नाशिकपर्यंत नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कसारा ते मनमाड दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला रेल्वे बोर्डाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या नवीन ट्रॅकमुळे एक्स्प्रेस आणि लोकल सेवा यांचे वेळापत्रक स्वतंत्र ठेवणे शक्य होईल. परिणामी प्रवाशांना नॉनस्टॉप प्रवासाचा आनंद घेता येईल आणि प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

मुंबई ते नाशिक हा मार्ग सह्याद्रीच्या डोंगररांगांतून जात असल्याने हे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असणार आहे. या नवीन रेल्वे मार्गिकेसाठी एकूण १८ नवीन बोगदे बांधावे लागणार आहेत. सह्याद्रीच्या घाट माथ्यावर हे बोगदे तयार केल्यामुळे रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. या दुर्गम भागात रेल्वेचे जाळे विस्तारल्यामुळे निसर्गरम्य प्रवासासोबतच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

कोणती प्रमुख स्टेशन्स?

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून त्याबाबतचे नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे. मध्य रेल्वे या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. कल्याण ते नाशिक रोड या दरम्यान कसारा, इगतपुरी आणि देवळाली ही ३ प्रमुख स्टेशन असणार आहेत. या मार्गावरील उपनगरांमधील प्रवाशांना या थेट लोकल सेवेचा मोठा फायदा होईल, ज्यामुळे त्यांना मुंबईला ये-जा करणे सोपे जाईल. मुंबई आणि नाशिक ही दोन्ही शहरे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. या थेट लोकल सेवेमुळे व्यापारी, नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-नाशिक दरम्यान लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. आता या मागणीला मूर्त स्वरूप येत असून, आगामी काळात प्रवाशांना स्वस्त आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासात एक नवे पान जोडले जाणार आहे.

Comments
Add Comment