Sunday, February 22, 2026

दक्षिण आफ्रिकेने भारताला दिले मोठे आव्हान

दक्षिण आफ्रिकेने भारताला दिले मोठे आव्हान

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सुपर एट फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत सात बाद १८७ धावा केल्या आणि भारतापुढे २० षटकांत १८८ धावा करण्याचे आव्हान ठेवले. भारताला जिंकण्यासाठी प्रत्येक षटकांत ९ पेक्षा जास्त धावा करण्याची आवश्यकता आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने ३५ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकार मारत ६३ धावा केल्या. डेवॉल्ड ब्रेव्हिसने २९ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ४५ धावा केल्या तर ट्रिस्टन स्टब्सने २४ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकार मारत ४४ धावांचे योगदान दिले. या तीन फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला भारतापुढे मोठे आव्हान ठेवणे शक्य झाले. एडेन मर्करामने ४, क्विंटन डी कॉकने ६, रायन रिकेलटनने ७, मार्को जॅनसेनने २, कॉर्बिन बॉशने ५ आणि कागिसो रबाडाने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले.

भारताकडून जसप्रीत बुमराहने क्विंटन डी कॉक, रायन रिकेलटन आणि कॉर्बिन बॉश या तिघांना बाद केले, त्याने ४ षटकांत १५ धावा देत ३ विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगने २ तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबेने प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानी शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या षटकांमध्ये धावांची लयलूट केली.

भारतात भारताविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त दोन वेळाच पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय दोन्ही वेळा न्यूझीलंडनेच घेतला होता आणि सामने जिंकले होते. नागपूरमध्ये २०१६ मध्ये आणि राजकोटमध्ये २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. त्यामुळे आता अहमदाबादमध्ये काय होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

दक्षिण आफ्रिकेने पॉवर प्लेमध्ये गमावल्या तीन विकेट

दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सात बाद १८७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर, डेवॉल्ड ब्रेव्हिस आणि ट्रिस्टन स्टब्सने धावांची लयलूट केली. याआधी पॉवर प्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेच्या १० धावा झाल्या असताना क्विंटन डी कॉक ७ चेंडूत १ चौकार मारत ६ धावा करुन परतला. त्याला जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले. तर एडेन मर्कराम ७ चेंडूत ४ धावा करुन बाद झाला. त्याला अर्शदीपने हार्दिककरवी झेलबाद केले. एडेन बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येत आणखी दोन धावांचीच भर पडली होती. यानंतर रायन रिकेलटनला बुमराहने शिवम दुबेकरवी झेलबाद केले. रायन ७ चेंडूत ७ धावा करुन परतला, त्याने एक षटकार मारला. दक्षिण आफ्रिकेने ३.६ षटकांत २० धावा झाल्या असतानाच ३ विकेट गमावल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेची चौथी विकेट थेट १३ व्या षटकांतच पडली.
Comments
Add Comment