Saturday, February 21, 2026

चैतन्य

चैतन्य

जीवनगंध : पूनम राणे

गावात देवीचा वार्षिक उत्सव होता. या उत्सवाच्या निमित्ताने गावातून शहराकडे गेलेल्या अनेक चाकरमानी लोकांनी तीन महिन्यांपासूनच आपल्या प्रवासाचे तिकीट बुकिंग करून ठेवले होते. हा एक असा उत्सव असतो की सगळेजण या दिवशी उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत असतात. त्यामुळे प्रत्येक जण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो.

विरळ लोकवस्ती असलेले हे गाव. गावात तशी घरामध्ये माणसंही एखाददुसरी. तीही वयस्कर, वृद्ध झालेली. काहींच्या घरी पती-पत्नी, तर काहींच्या घरी कोणीतरी एकटेच, कारण कामानिमित्त बऱ्याच तरुणांनी आपलं गाव सोडून मुंबईचा, पुण्याचा रस्ता धरलेला होता.

काही उत्सवाच्या किंवा कार्यक्रमाच्या किंवा महत्त्वाच्या कामानिमित्तानेच गावी येणं व्हायचं. घराच्या कौलावर गवत वाढलेलं. घराच्या आजूबाजूलाही वाढलेल्या गवतामुळे घर दिसेनासे झालेलं. काही घरे व त्यावरील वासे मोडकळीस येऊन खाली पडलेले. कारण कित्येक वर्षं या घरात कोणीही फिरकलेल नव्हतं. पूर्वीच्या काळी गोठ्यात मोठ्या प्रमाणात गाई म्हशी, बैल असायचे. त्यामुळे घरात मुबलक दूध-दुबतेही मिळायचे; परंतु पूर्णतः आता गोठा रिकामी होऊन केवळ उरले दावण.

उत्सवाच्या निमित्ताने, गावी आलेला, परिस्थितीने उत्तम असणारा रोहित, याला मात्र ही परिस्थिती पाहवली नाही. उत्सवाच्या निमित्ताने एकत्रित झालेल्या तरुण मंडळींना त्याने एकत्र करायचे ठरवले.

गावाकडून मुंबईमध्ये जाणाऱ्या मुलांचा ओढा कमी झाला पाहिजे असे त्याला वाटले आणि त्यासाठी रोजगाराच्या संधी आपल्याला गावातच निर्माण करून द्यायला हव्यात, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत असा निर्णय त्यांनी सर्वांसमोर घेतला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याने आपल्या गावात एक उत्तम शाळा व कारखाना काढायचे ठरवले.

गरजूंना या कारखान्यात चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या लागतील, विद्यार्थी चांगले शिक्षण घेतील आणि तरुण इथे स्थिरावतील असे त्याला वाटले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर याबाबतीत आपण अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीने पुढील योजना आखणार आहोत असेही सभेपुढे त्यांने आपले विचार मांडले.

सर्वांनी या गोष्टीला अनुमती दिली. आपले सुजलाम सुफलाम गाव असेच राहिले पाहिजे असेच सर्वांना वाटत होते. आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू या. असे एकमताने ठरले. दोन-चार वर्षांतच प्रशस्त हॉस्पिटल, तसेच प्रशस्त ग्रंथालय, समृद्ध प्रयोगशाळा, संगणक कक्ष, विविध रंगांच्या फळा-फुलांची झाडे असलेली प्रशस्त देखणी बाग, डिजिटल वर्ग खोल्या अशी शाळा सुरू केली. तसेच कारखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. कारखाना गावात तयार झाला. अनेक तरुण मंडळींना या कारखान्यात नोकरी लागली. गावामध्ये अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा करण्यात आल्या. अनेक विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला बाजूच्या गावातील लोकांनाही या कारखान्यात नोकरी मिळू लागली. त्यांची मुले या शाळेत प्रवेश घेऊ लागली. आता गाव गजबजल्यासारखे वाटू लागले. गावात चैतन्य निर्माण झाले. गावातील सर्वांनी या कामाबद्दल रोहितचा मोठा सत्कार केला.

तात्पर्य : एक सकारात्मक विचार खूप मोठा बदल घडवून आणू शकतो.

Comments
Add Comment