स्मृतीगंध : लता गुठे
आमचं साधारण पाच हजार लोकवस्तीचं गाव. नगर जिल्ह्यातल्या बॉर्डरवर असलेलं, नाव भालगाव. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं. गावामध्ये हायस्कूल, गावाच्या मधोमध मोठी पेठ. त्या पेठेमध्ये मारवाड्याची दुकानं, वाडे. त्याच्या बाजूला संपूर्ण पेठेमध्ये दगडांनी बांधलेले वटे. त्या ओट्यांवर गावातील शेतकरी भाजीपाला, फळं विकण्यासाठी बसत असत. त्या पेठेच्या दोन्ही टोकाला दोन वेसी होत्या. त्याच्या बाजूला चावडी आणि दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत. मध्ये एक पिंपळाचा पार आणि आजूबाजूला तीन-चार जुनी मंदिरं हेमाडी पंथीयाच्या काळातील दगडात बांधलेली. फक्त विठ्ठलाचे मंदिर गावात पेठेत होते. तिथे एकादशीला कीर्तन, भजन असायचे आणि वर्षभर ग्रंथाचे वाचन चालत असे, त्याला पोथी असे म्हणत. सर्व मंडळी संध्याकाळचे जेवण उरकून पोथीला जात असत. त्यावेळी गावात लाईट नव्हती. हातात उजळलेले कंदील घेऊन बाया बापड्या, माणसं एक एक करत मंदिराचे अंगण भरत असे. माझी आजी नित्यनियमाने पोथी ऐकायला जात असे. तिच्याबरोबर आम्हीही जात असू. त्यामुळे लहानपणापासूनच रामायण, महाभारत या ग्रंथांची तोंडओळख झाली आणि अध्यात्मिक विषयात रुची वाटू लागली. चांगलं-वाईट कळण्याचे ते वय नव्हते, परंतु ते संस्कार कानावर आणि मनावर झाले ते कायमचे.
अशा या गावात आमचाही एक चिरेबंदी वाडा होता. त्याला चारी बाजूने भक्कम चिऱ्यांमध्ये बांधलेल्या भिंती. काळ्या दगडांमध्ये घडवलेले चिरे एकमेकांत चुन्याने जोडून छान डिझाईन झालेले असायचे. त्या चिऱ्याने बांधलेले समोर ओटे. भिंतीवर दिवे लावण्यासाठी भिंतीला कोरलेल्या देवळ्या असत. दाराच्या लाकडी कोरीव चौकटी आणि अडकवलेली मोठी लोखंडी कडी. बाहेर बसायला दोन्ही बाजूला ओटे आणि समोर मोठे अंगण. सकाळी उठून आई किंवा काकू हातात झाडू घेऊन घराचा संपूर्ण परिसर झाडून काढत. शेणाचा सडा अंगणभर टाकायचा हा नियमच असे आणि सडा टाकताना, झाडताना त्या ओव्या म्हणत असत. ती गाणी अशी... सकाळी उठून हाती माझ्या सडापात्र सडा टाकते पवित्र राम रथातून उतरं सकाळी उठून हाती माझ्या झाडणी झाडते ईश्वराची न्हानी राम मनी राम ध्यानी रामावाचून नाही कोणी
अशाप्रकारे त्यांच्या कामाची सुरुवात होत असे. कर्म म्हणजेच पूजा. ते करताना परमेश्वराला अर्पण करण्याइतकं कर्म पवित्र झालं पाहिजे हा त्यामागचा भाव. आणखी एक गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर ईश्वराचे चिंतन, मनन केले तर आपोआपच एक सकारात्मक ऊर्जाही आपल्यामध्ये निर्माण होते ती पूर्ण दिवसभर पुरते. अशा ओव्या सकाळी सकाळी कानावर पडायच्या. हे संस्कार आम्हाला बालवयात मिळाले त्यामुळे आमची पिढी अनेक गोष्टींसाठी भाग्यवान आहे असं मला वाटतं.
आता अंगणामधून वाड्यामध्ये प्रवेश करू या...
दगडी पायऱ्या चढून गेलं की मध्ये आडवा उंबरा लागे. तो स्पीड ब्रेकर असायचा. तिथे पायातील चपला काढताना बाहेरचे ताण-तणाव, नकारात्मक गोष्टी बाहेर सोडून आज प्रवेश करण्यासाठी. या उंबऱ्यावर कित्येक सुहासिनीचे पहिले पाऊल पडले असेल. तो उंबरा म्हणजे घराच्या मर्यादेचा रक्षक असायचा. घरात प्रवेश करताच दोन्ही बाजूला मोठ्या लांबलचक ओपण खोल्या. एका बाजूला बैठक असायची. तिथे येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता खूप असायचा आणि मधोमध चौक. चौकात मोठ्या दगडात घडवलेला चौरंग. त्याच्या बाजूला पाणी भरलेले पितळी बादली. त्यामध्ये पाय धुण्यासाठी ठेवलेले पितळी तांब्या असे. पाणी तांब्याने पायावर टाकूनच माजघरामध्ये प्रवेश करावा लागे. चौकातच मोठे पाण्याचे रांजण. त्याच्या बाजूला तुळशीवृंदावन. त्या तुळशीला पाणी घालताना आजी, आई हात जोडून प्रार्थना करत असत. ती प्रार्थना आजही मला आठवते... तुळशी स्त्री सखे शुभ पाप हरिणी पुण्य दे नमस्ते नादनुते नारायणा मंडपी दे !
तुळशीचं रोप म्हणजे फक्त झाडाचं रोपटं नव्हतं तर ती समस्त स्त्रियांची पवित्र सखी होती. ती त्यांच्या फुललेल्या मनातील चैतन्याचे प्रतीक होती. चौकाच्या वरचा भाग संपूर्ण खुला असल्यामुळे प्रकाश, हवा भरपूर संपूर्ण वाड्यामध्ये खेळती राहायची. वाड्याला अनेक खोल्या असायच्या. यामध्ये सामानांची खोली वेगळी, बाळंतिणीची खोली वेगळी आणि मध्ये लांबलचक ओसरी. त्या ओसरीवर भिंतीला लायनीत लावलेले फोटो. यामध्ये शिवाजी महाराज, गांधीजी, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, विवेकानंद अशा थोर महापुरुषांचे रोज दर्शन घडत असे. पांढऱ्याशुभ्र सारवलेल्या भिंती आणि खाली शेणाने सारवायचा परवर असे. त्या भिंती सारवण्यासाठी काकू, आई खास गावातील बुरुजाची पांढरी माती आणत असत. सारवताना भिंतीवर त्यांच्या बोटांची छान महेरीप उमटत असे. त्यामध्ये त्यांचे प्रेम, जिव्हाळा आपुलकी हे सर्व दिसून येत असे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये मोठा एक देव्हारा होता. त्या देव्हाऱ्यामध्ये कुलदैवतांच्या मूर्ती ठेवलेल्या असत. प्रत्येक सणवार, उत्सव, घरातील मंगलकार्य यावेळी विशेष पूजा केली जात असे.
आमच्या आजोबांना एक सावत्र भाऊ होता. त्यांचे कुटुंबही वाड्याच्या अर्ध्या भागामध्ये राहत असे. आमच्या गावात हायस्कूल असल्यामुळे आजीने अनेक नातेवाइकांची मुलं आणून आमच्याबरोबर त्यांनाही शिकवलं. आमच्या घरामध्ये आई-बाबा, आजोबा-आजी, काका-काकू त्यांची सर्व मुलं असा सर्व आमचा मोठा परिवार असल्यामुळे नैसर्गिकच सामाजिकरण कळत-नकळत आपोआप अंगी उतरले. एकमेकांना वाटून देणे घेण्याची सवय लागली. एकमेकांच्या विषयी जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, माया या गोष्टी करायला खास कोणी शिकवलं नाही; परंतु मोठ्यांच्या अनुकरणातून त्या अंगीकारल्या गेल्या. त्याचबरोबर आजूबाजूचे शेजारीपाजारी म्हणजे मामा, मावशी, काका-काकू अशा नात्यांनी जोडली जाजची, त्यामुळे त्यांचाही घरच्यांसारखाच जिव्हाळा आणि धाकही असायचा. एखाद्या दिवशी घरातील भाजी नाही आवडली, तर काकू भाजी काय केली? असं विचारण्यात संकोच वाटत नव्हता.
आज हे सर्व हरवलं आहे. गावातली अनेक कुटुंब शेतामध्ये बंगले बांधून तेथे राहायला गेली आहेत. गावातील वाडे ओस पडले आहेत. गावाचं गावपण हरवलं आहे. माणूस एकमेकांपासून तुटत चालला आहे याची प्रकर्षाने जाणीव होते आहे. पूर्वीचे गावात उभे असलेले चिरेबंदी वाडे म्हणजे केवळ दगडांनी रचलेली घरे नव्हती, ती एका संस्कृतीची, एका परंपरेची आणि अनेक पिढ्यांच्या आठवणींची जिवंत स्मारके होती. काळ्या चिऱ्यांच्या भक्कम भिंती, विशाल अंगण, लाकडी खांब आणि वरती असलेलं भक्कम छत या साऱ्यांत एक वेगळाच रुबाब असायचा. त्या वाड्यांच्या प्रत्येक दगडात एक अलिखित कथा असायची आणि त्या कथांमध्ये आपले रम्य बालपण ताजेतवाणे राहायचे.







