Saturday, February 21, 2026

‘अलिन’ आशेचा एक दीप !

‘अलिन’ आशेचा एक दीप !

“केरळमधील दहा महिन्यांची अलिन वयाने सगळ्यात लहान असलेली डोनर आहे. आपलं मूल हे आईचं काळीज असतं. मुलीच्या निधनानंतर आपलं काळीज तुटलेलं असताना एका आईनं आपल्या मुलीचं काळीज काढून देणं, हे सुदृढ समाजाचं लक्षण आहे. देहदान व अवयवदान म्हणजे ‘जिंदगी के बाद भी जिंदगी’. परंपरेतून प्रगतीकडे हे संस्थेचे ब्रीदवाक्य म्हणजे केवळ शब्द नसून संस्थेच्या कामाचा आत्मा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दान या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे. आज दानाला आधुनिक विज्ञान आणि मानवतेची जोड देऊन आम्ही काम करत आहोत. आजही समाजात देहदानाबद्दल एक प्रकारचे मौन पाळलं जातं. भीती, अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतीमुळे लोक मागे सरकतात. पण हे मौन तोडणं ही काळाची गरज आहे. नेत्रदान, अवयवदान, त्वचादान आणि देहदानातून आपण मृत्यूवर विजय मिळवू शकतो. दुसऱ्याच्या रूपाने जिवंत राहू शकतो.” - पुरुषोत्तम पवार

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर 

ती जन्माला आली. टपोऱ्या डोळ्यांची... तिच्या हुंकाराने घरही बागडू लागलं. तान्हुली आईच्या मांडीवरून उतरून आता कुठे घरभर रांगू लागली होती. अलिन म्हणजे बहुधा आपणच असं तिला आतासं थोडं-थोडं कळू लागलं होतं. अलिन ही हाक ऐकताच खुदकन हसायची... रांगता रांगता थोडं धडपडत...पडत जमतंय का बुवा उभं राहायला...आपली आपणच ऊठ - बस करू लागली. तान्हुलीच्या या लीला पाहणं म्हणजे आमच्यासाठी एक सोहळाच होता.
अगदी दोनच महिन्यांवर येऊन ठेपलेला लेकीचा पहिला वाढदिवस कसा साजरा कारायचा याच्या चर्चा आताशा घरात थोड्या-थोड्या रंगू लागल्या होत्या. पण काळाचा एकच घाला आणि अलिन एखाद्या परीकथेतील परीसारखी आम्हाला प्रेमाचा स्पर्श करून कुठे तरी दूर अज्ञाताच्या वाटेवर निघून गेली. माझं मन मानतच नव्हतं... अलिन मला सोडून गेली. आई नजरेआड झाली की घरभर हुंकारत मला शोधणारी माझी तान्हुली माझ्याशिवाय एकटी कशी राहणार... अलिन आता या जगात नाही आहे हे सत्य कसं पटवू मनाला... कसं स्वीकारू मनाला वेदना देणारं हे वास्तव... माझी अलिन मृत नाहीच... मनात जपलेला तिचा पहिला हुंकार अजूनही ऐकू येतोय मला... अम्मा अम्मा अशी हाक मारायला मी तिला शिकवत असतानाची तिची ओठांची थरथर अजूनही नजरेसमोरून जात नाही आहे माझ्या... नि माझ्या छातीवर डोक ठेवून निवांत झोपलेल्या तान्हुलीच्या छातीचे ठोके अजूनही ऐकू येत आहेत मला... कसं स्वीकारू ती नाही आहे या जगात... नऊ महिने पोटात वाढवलेला, माझ्याच शरीराचा भाग असलेला हा केवळ मांसाचा गोळा नव्हता...
त्यात चैतन्य होतं माझ्या संस्कारांचं...
हे चैतन्य मला जपायचं आहे.
अलिन तर या जगात पार्थिव अर्थाने नाही, पण माझ्या गर्भात तयार झालेले तिचे इवले इवले अवयव मातीत मिसळू द्यायचे नाहीत मला... सचेतन करायचं आहे तिला... कोणत्या न कोणत्या रूपात रुजवायचं आहे माझ्या तान्हुलीला... ही कपोकल्पित वाटणारी कथा केवळ कपोकल्पित कथा नाही. असंच काहीसं घडलं असेल अवयवदान करणाऱ्या वयाने सगळ्यात लहान ‘ऑर्गन डोनर’ ठरलेल्या केरळमधील अलिनच्या घरात.
काळीज हेलावणारी ही बातमी वाचली. देहदान व अवयवदान चळवळीसाठी काम करणाऱ्या वसईतील पुरुषोत्तम पवार यांच्या स्टेटसवर. बोट आणि नजर तिथेच त्या बातमीवर थांबली... मनाला हेलावणारी बातमी होती, अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाच्या देहदानाची. ही बातमी वाचताच काळजात कालवाकालव झाली. फक्त दहा महिन्यांचं गोंडस बाळ एका अपघातात जग सोडून निघून गेलं... पहिल्यांदा तर डोक्यात तिडीक गेली... काय हे, दिवसेंदिवस बेदरकारपणे वाहन चालवून दुसऱ्यांचे जीव घेणाऱ्या अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. माणसाचं आयुष्य इतकं स्वस्त झालंय... किती असुरक्षित आयुष्य जगत आहोत आपण याची जाणीव अजूनच गडद झाली, पण पुन्हा विचार त्या दहा महिन्यांच्या बाळाच्या देहदानाच्या बातमीवरच येऊन थांबले. नेमकं काय झालं या बाळाचं, ही घटना घडल्यावर बाळाच्या आई-वडिलांचं नेमकं काय झालं असेल...
आपल्या पोटचा गोळा गमावल्यानंतर अतिशय वाईट मनःस्थितीत बाळाच्या देहदानाचा विधायक निर्णय, इतक्या तत्परतेने आई-वडिलांनी कसा घेतला असेल असे अनेक प्रश्न मनात आले आणि गुगलवर अधिक माहितीसाठी क्लिक केले.केरळमधील अलिन शेरीन अब्राहम या दहा महिन्यांच्या बाळाच्या देहदानाची ही बातमी. अलिन आपल्या आई-बाबांसोबत ज्या गाडीतून चालली होती, त्या गाडीला अपघात झाला. त्या अपघातात अलिनला प्रचंड दुखापत झाली. उपचारांसाठी ताबडतोब बाळाला जवळच्या इस्पितळात नेण्यात आले; परंतु दुर्दैव असे की बाळाच्या मेंदूला प्रचंड दुखापत झाल्याने बाळाला वाचवता आले नाही आणि डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. आपल्या बाळाच्या मृत्यूचे दुःख तिच्या आई-बाबांना किती झाले असेल याची कल्पनाही  करवत नाही. पण त्याही परिस्थितीत बाळाच्या आई-वडिलांनी अतिशय धैर्याने निर्णय घेतला आणि तो म्हणजे  बाळाच्या अवयवदानाचा.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सन्मानपूर्वक अलिनचे अवयवदान करण्यात आले ज्यातून पाच जणांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली. अलिनची संपूर्ण बातमी वाचली आणि पहिला दंडवत केला तो अलिनच्या आई-वडिलांना. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बाळाचा मृत्यू पाहिलेल्या, दुःखात बुडालेल्या आई-वडिलांनी सहृदयतेने दाखवलेले धैर्य वंदनीय आहे. आपल्या वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून घेतलेल्या निर्णयामुळे अलिन आज आशेचा किरण म्हणून संपूर्ण जगासमोर दातृत्वाचे एक उदाहरण ठरली आहे. जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगुर आहे असे आपण नेहमी म्हणत असतो किंबहुना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून आपल्याला जीवनाच्या नश्वरतेची अनेकदा जाणीवही होत असते;
परंतु मातीत मिसळणाऱ्या या देहाला मरणानंतरही सन्मानपूर्वक सचेतन ठेवण्याचे एक माध्यम म्हणजे देहदान-अवयवदान. देहदान व अवयवदान चळवळीसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्याशी या विषयावर संवाद साधला. याविषयी ते म्हणाले,  फेडरेशनच्या स्थापनेविषयी सांगताना पुरुषोत्तम पवार म्हणाले,“लोकसंख्येच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असलेला आपला भारत देश अवयवदानात तळाच्या क्रमांकावर आहे. ही खेदजनक वस्तुस्थिती दूर व्हावी या उद्देशाने देशात अनेक व्यक्ती, संस्था एकाकीपणे धडपड करत होत्या. अतोनात मेहनत करून देखील कार्याला हवे तसे यश मिळत नव्हते. कारण त्यांचे कार्य एकसंध नव्हते.
याकरिता देशभरातील संस्था व कार्यकर्त्यांना एका छताखाली आणण्यासाठी २०१५ मध्ये दि फेडेरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली.” पुरुषोत्तम पवार यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांमधून सुरू झालेल्या दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या महाराष्ट्रात आता बारा जिल्हा शाखा कार्यरत असून १९ जिल्हा शाखांची बांधणी प्रगतिपथावर आहे.महाराष्ट्राबाहेर गोव्यात देखील फेडरेशन कार्यरत आहे. प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी अवयवदान, देहदानाबद्दल जनजागृती, समुपदेशन, कायदेशीर मदत, अवयवदान व देहदानाची प्रक्रिया अशा विविध पातळ्यांवर निष्ठेने कार्य करत आहे.
माणसाचं अस्तित्व म्हणजे तरी काय? हा प्रश्न अनेकदा प्रत्येकाला पडतो. आपण आता श्वास घेत आहोत तोपर्यंत आपलं अस्तित्व. जसं बहिणाबाई म्हणते, ‘आला सास, गेला सास, जिवा तुझं रे तंतर, अरे जगणं – मरण एका सासाचं अंतर ’... बहिणाबाईंच्या या ओळी मानवी जीवन नश्वर आहे याची सहजगत्या जाणीव करून देतात, पण अलिनसारखं एखादं उदाहरण जगासमोर नश्वरतेच्या पलीकडचा जगण्याचा अर्थ सांगून जातं. देहदान, c करून अनेकांना जीवनसंजीवनी देणाऱ्या दात्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सलाम!
ashwinibhoir23@gmail.com
 दि फेडरेशन ऑफ ऑर्गन and बॉडी डोनेशन या संस्थेची वेबसाईट www.organdonation.net.in
Comments
Add Comment