Saturday, March 14, 2026

२१ फेब्रुवारीलाच का साजरा करतात जागतिक मातृभाषा दिन? जाणून घ्या इतिहास

२१ फेब्रुवारीलाच का साजरा करतात जागतिक मातृभाषा दिन? जाणून घ्या इतिहास

मुंबई : भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो. बहुभाषावादाला प्रोत्साहन देणे आणि लोप पावत चाललेल्या भाषांबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसामागील प्रमुख हेतू आहे.

हा दिवस प्रथम १९९९ साली UNESCO च्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. त्यानंतर २००२ मध्ये युनाइटेड नेशनच्या आमसभेने अधिकृत मान्यता दिली. तेव्हापासून २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

भाषिक विविधतेचे महत्त्व

जगभरात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात. भारतात संविधानमान्य २२ भाषा असून, विविध बोलीभाषांसह सुमारे १३०० हून अधिक मातृभाषा अस्तित्वात आहेत. जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि स्थलांतर यामुळे अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर मातृभाषेचे जतन, प्रसार आणि शिक्षणात मातृभाषेचा वापर वाढवणे यावर भर देण्यासाठी विविध देशांमध्ये कार्यक्रम, परिसंवाद आणि जनजागृती उपक्रम आयोजित केले जातात.

२१ फेब्रुवारीच का?

१९५२ साली तत्कालीन पाकिस्तानमध्ये उर्दूला अधिकृत भाषा घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बंगाली भाषेलाही अधिकृत मान्यता देण्यात आली. भाषिक हक्कांसाठी दिलेल्या या बलिदानाच्या स्मरणार्थ २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक मातृभाषा दिन हा केवळ एक औपचारिक दिन नसून, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा आणि तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचा दिवस मानला जातो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >