Saturday, February 21, 2026

सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी मुंबईकरांना बनवणार फिट

सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी मुंबईकरांना बनवणार फिट

'फिट मुंबई' पुढाकार अंतर्गत वांद्रे येथे 'फिट सॅटर्डे' मोहीम संपन्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : व्यायाम न करणाऱ्यांना नियमित व्यायाम करण्याची प्रेरणा मिळावी, न चालणाऱ्यांना चालायला लावणे, चालणाऱ्यांना जॉगिंगसाठी प्रोत्साहित करणे आणि जॉगिंग करणाऱ्यांना धावण्यासाठी प्रेरित करणे हा ‘फिट सॅटर्डे’ या मोहिमेचा उद्देश आहे. “फिट मुंबई” या अभियानाचे घोषवाक्य ‘फिटनेस दिल से’ असे असून प्रत्येक मुंबईकराच्या फिटनेस प्रवासाला नवी दिशा देत आहे. ही केवळ मोहीम नसून मुंबईकरांनी मुंबईकरांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. ही चळवळ अधिक प्रबळ करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन या मोहिमेला पाठबळ द्यावे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.

मुंबईकर नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी, या उद्देशाने 'फिट इंडिया'च्या धर्तीवर महानगरपालिकेतर्फे 'फिट मुंबई' पुढाकार अंतर्गत 'फिट सॅटर्डे' ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ गतवर्षी २५ ऑक्टोबर २०२५) वांद्रे किल्ला उद्यान येथे करण्यात आला होता. यापुढे प्रत्येक शनिवारी सकाळी ६.३० वाजता वांद्रे येथील किल्ला उद्यान परिसर आणि एम. आय. जी. क्लब या ठिकाणी ही मोहीम पार पडणार आहे. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये ही मोहीम राबविण्याचे प्रस्तावित आहे.

दरम्यान आज आयोजित 'फिट सॅटर्डे' उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. योगा, प्राणायाम, ध्यानधारणा (मेडिटेशन) यासह चालणे, धावणे, झुंबा यासारखे विविध व्यायाम प्रकार यावेळी करण्यात आले. सहभागी नागरिकांनी नियमित व्यायाम व निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.

मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी अंबरनाथ खुळे, महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सहायक आयुक्त (एच पूर्व) मृदुला अंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (एच पूर्व) डॉ. प्राजक्ता आंबेरकर यांच्यासह स्थानिक नागरिक या उपक्रमात सहभागी झाले. एम. आय. जी. क्लबचे सचिव निशांत पाटणकर,  सुबोध कुलकर्णी आणि शिल्पा योगा स्कूल यांचे संयोजन सहकार्य लाभले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा