Saturday, February 21, 2026

नाट्य निरंतर राहो...

नाट्य निरंतर राहो...

राजरंग : राज चिंचणकर

मराठी नाट्यसृष्टीत अनेक नाट्यकृती तर सादर होतातच; परंतु या क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रम त्या सोबतीने विविध पातळीवर सुरू असतात. असाच एक उपक्रम गेली १४ वर्षे नाट्यसृष्टीच्या सोबतीने चालत आला आहे. हा उपक्रम राबवला जातो, तो ‘मराठी नाटक समूह’ या ग्रूपच्या माध्यमातून...! या समूहात नाट्यसृष्टीशी संबंधित अनेक मंडळी आहेत आणि त्यांच्या सहकार्याने मराठी नाटक समूह गेली १४ वर्षे विविध गोष्टींच्या माध्यमातून महत्त्वाचे योगदान देत आला आहे. आता १४ वर्षे होत असताना मराठी नाटक समूहाने ‘नाट्य निरंतर’ असा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. ‘संकल्पना ते सादरीकरण : एक निरंतर प्रक्रिया’ असे या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्वरूप असून, ‘मराठी नाटक समूह’ आणि ‘अभिषेक थिएटर्स’ यांनी मिळून या उपक्रमाची पायाभरणी केली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या उपक्रमाला सहकार्य करत आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा पडदा उघडत आहे. माहीम-माटुंगा येथील यशवंत नाट्यसंकुलात असलेल्या साळगांवकर प्रायोगिक रंगमंचावर या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे.

एखादे नाटक म्हणजे संकल्पना ते सादरीकरण असा निरंतर प्रवास असतो. याच प्रवासाशी निगडित घटकांचा म्हणजे नव्या-जुन्या नाटकांची ओळख, स्वगते, कथा, कविता, नाट्य अभिवाचन, एकल प्रयोग, प्रहसन, गप्पा, चर्चा, मुलाखती, मार्गदर्शन अशा प्रकारच्या नाटकाशी व साहित्याशी संबंधित गोष्टींचा समावेश या ‘नाट्य निरंतन’मध्ये करण्यात आला आहे. गेल्या १४ वर्षांच्या काळात मराठी नाटक समूहाने ‘प्रायोगिक नाट्य महोत्सव’, ‘नाट्यलेखन स्पर्धा’, ‘पत्रलेखन स्पर्धा’, ‘विक्रमादित्य दामले’, ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’; असे विविध कार्यक्रम व उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. इतकेच नव्हे; तर कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मराठी नाटक समूहाने, पडद्यामागच्या कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्यात मोठा पुढाकार घेतला होता. मागच्या वर्षी ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’ या कार्यक्रमानंतर मराठी नाटक समूहाचा कुठलाच कार्यक्रम सादर झाला नाही. मात्र आता ‘नाट्य निरंतन’च्या माध्यमातून मराठी नाटक समूह नव्याने ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.

या एकूणच नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या बाबतीत मराठी नाटक समूहातर्फे भूमिका मांडताना रंगकर्मी आशीर्वाद मराठे सांगतात, आमचा हा ‘नाट्य निरंतर’ उपक्रम ‘मराठी नाटक समूह’ व ‘अभिषेक थिएटर्स’ मिळून, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सहकार्याने सुरू करत आहोत. नावीन्य हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असेल. इतर ठिकाणी आधीच सादर झालेल्या गोष्टी इथे कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या उपक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक नवीन प्रयोग केले जातील.

२७ फेब्रुवारी रोजी असलेल्या मराठी भाषा गौरव दिनाचा मुहूर्त साधत आम्ही हा उपक्रम सुरू करत आहोत. सध्या वर्षभर तरी दर महिन्याला हा उप्रक्रम करण्याचा आमचा मानस आहे. पहिल्या प्रयोगानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढच्या योजना ठरवण्यात येतील. नाट्य आणि साहित्य यांचा संगम या निमित्ताने करण्यात येणार आहे. नवीन काही सादर करण्याच्या दृष्टीने यात चर्चाही होतील आणि नवीन संकल्पनांना या उपक्रमाच्या माध्यमातून उजाळा मिळेल, असा यामागचा आमचा उद्देश आहे.

Comments
Add Comment