टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
हरिश दुधाडेने मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘क्रांती ज्योती विद्यालयं-मराठी माध्यम’ या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहते. नुकतेच या चित्रपटाने थिएटरमध्ये रिलीज पन्नास दिवस साजरे केले आहेत.
हरिशचे शालेय शिक्षण अहमदनगरच्या श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालामध्ये झाले. शाळेमध्ये श्लोक पठण केल्याने त्याची वाचा शुद्ध झाली. बोलण्यामध्ये स्पष्टपणा आला. चित्रकला, गाण्याच्या स्पर्धेत, नाटकामध्ये त्याने भाग घेतला होता. त्याच्या जडणघडण्यामध्ये शाळेचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्याने कॉलेजमध्ये एकांकिकेचे दिग्दर्शन केले. काही एकांकिकेमध्ये काम केले. कॉलेजमध्ये वर्गापेक्षा जास्त तो एकांकिकेच्या तालमीच्या ठिकाणी असायचा. त्यावेळी त्याला कॉलेजच्या शिक्षकांकडून भरपूर पाठिंबा मिळाला. त्यानंतर त्याने मुंबई गाठली.
एम. बी. ए. झाल्यावर मुंबईमध्ये दोन महिने त्याला काम मिळाले नाही. दोन महिन्यांनंतर त्याला एका मराठी चॅनेल वरील 'कन्यादान' ही पहिली मालिका मिळाली.तिथून त्याचे या क्षेत्रात पदार्पण झाले. हा त्याच्या जीवनातील मोठा टर्निंग पॉइंट होता.‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत त्याने साकारलेला पोलीस अधिकारी प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिलेला आहे. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात त्याने बहिर्जी नाईकची भूमिका साकारली होती. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी बहिर्जी नाईकची भूमिका त्याची आवडती भूमिका होती. ‘वीर मुरारबाजी’ या आगामी चित्रपटात देखील त्याने बहिर्जी नाईकची भूमिका साकारली आहे.
हरिश दुधाडे व हेमंत ढोमे फार जुने मित्र आहेत. लेखक व दिग्दर्शक हेमंतला नेहमी कथेनुसार हरिशसोबत काम करण्याची इच्छा असते. ‘फर्स्ट क्लास दाभाडे’ या चित्रपटांमध्ये ते होते. आता ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटात ते एकत्र आहेत. या चित्रपटामध्ये मराठी भाषेतील शाळेबद्दल भाष्य केले आहे. मराठी भाषेच्या शाळांची पटसंख्या कमी झाली, तर शाळा बंद होण्याचा मोठा धोका आहे, जो मराठी भाषेच्या अस्तित्वाला धोका आहे. मोठ्या संख्येने मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात आहेत. त्यामुळे मराठी शाळेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे; परंतु मराठी आपली मातृभाषा आहे. ती टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतले तर तुम्ही इतर भाषा लवकर शिकू शकतात. मराठी भाषेला इतिहास आहे, आपली मराठी भाषा आपली आई आहे तिला वाचविणे आवश्यक आहे, या चित्रपटात तुझी कोणती भूमिका आहे असे विचारल्यावर तो म्हणाला की राकेश घरत नावाची व्यक्तिरेख मी साकारीत आहे. तो मराठी माणूस आहे, त्याचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे. आंब्याचा व्यापारी आहे. त्याला दोन मुली आहेत, त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले असते; परंतु त्या शिवाय त्यांचे काही अडले नाही. इंग्रजी बोलता येणे ही एक कला आहे. लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे सोबत व इतर कलावंतांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारल्यावर तो म्हणाला की, हेमंत तर माझा मित्र आहे, त्याच्यासोबत व क्षितीसोबत माझे ट्युनिंग चांगले आहे. हेमंतच्या मनामध्ये काय चालले आहे हे मी ओळखतो व त्याला जे अपेक्षित आहे, ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. हेमंत एक गुणी लेखक व दिग्दर्शक आहे, प्रत्येक वेळी नवीन काही तरी आणण्याचा प्रयत्न तो करीत असतो, त्यामुळे त्याच्या सोबत काम करायला मिळणे ही पर्वणीच असते. सचिन खेडेकरांसोबत या अगोदर मी ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांच्याकडून आजदेखील भरपूर गोष्टी आम्ही शिकत आहोत. ज्येष्ठ लेखक व कवी रत्नाकर मतकरी यांनी ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे गाणे लिहिलेले आहे, जे खूप लोकप्रिय झालेले आहे. हेमंत ढोमेच्या कर्जतच्या अभिनव विद्यालयामध्ये या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय असे मत त्याने व्यक्त केले.







