अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली. भारताने सिडनीत झालेला पहिला सामना पावसाच्या व्यत्ययानंतर डडकर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियाने मनुका ओव्हल येथे झालेला सामना १९ धावांनी जिंकला. निर्णायक असलेला अॅडलेड ओव्हल येथील सामना भारताने १७ धावांनी जिंकला.
अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने २० षटकांत सहा बाद १७६ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला २० षटकांत नऊ बाद १५९ धावा करणेच जमले. भारताने सामन्यात १७ धावांनी बाजी मारत तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. अॅडलेड ओव्हल येथील सामन्यात भारताची स्मृती मानधना सामनावीर झाली. स्मृतीनं ५५ चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकार मारत ८२ धावांची खेळी केली. स्मृतीला अॅनाबेल सदरलँडच्या चेंडूवर अॅशले गार्डनरने झेलबाद केले.
प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळत झाली होती. शेफाली वर्मा (७) स्वस्तात बाद झाली. मात्र, त्यानंतर स्मृती मानधनाने (८२ धावा, ५५ चेंडू) आणि जेमिमा रॉड्रिग्जने (५९ धावा, ४६ चेंडू) दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची अभूतपूर्व भागीदारी केली. स्मृतीने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचले, तर रिचा घोषने ७ चेंडूत १८ धावांची वेगवान खेळी केल्यामुळे भारताने २० षटकांत १७६/६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या श्रेयांका पाटीलने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले. तिने एलीस पेरीसारख्या दिग्गज खेळाडूला अवघ्या १ धावेवर बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून ॲशले गार्डनरने सर्वाधिक ५७ धावा केल्या, पण तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला लगाम घातला. अरुंधती रेड्डीनेही २ महत्त्वाचे बळी टिपले. ऑस्ट्रेलियाचा डाव २० षटकांत १५९/९ वर मर्यादित राहिला.
जेमिमाहचा विक्रम
जेमिमाहने हे अर्धशतक करताना ११८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत २५०० धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारी ती भारताची चौथी खेळाडू आहे. तिच्याआधी स्मृती मानधना (४२३१ धावा), हरमनप्रीत कौर (३८२२ धावा) आणि शफाली वर्मा (२५१९ धावा) यांनी हा टप्पा पार केला आहे.
एलिस पेरीची अष्टपैलू खेळी
ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू एलिस पेरीसाठी हा ३५० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. ती ३५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारी ऑस्ट्रेलियाची पहिली खेळाडू आहे. तसेच एकूण तिसरी खेळाडू आहे. तिच्याआधी भारताची हरमनप्रीत कौर आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स यांनी हा विक्रम केला आहे. हरमनप्रीतने ३५७ सामने खेळले, तर सुझी बेट्सने ३५५ सामने खेळले आहेत.
सामन्याचे संक्षिप्त धावफलक: भारत महिला: १७६/६ (स्मृती मानधना ८२, जेमिमा रॉड्रिग्ज ५९; सदरलँड २/३४) ऑस्ट्रेलिया महिला: १५९/९ (ॲशले गार्डनर ५७, फोबी लिचफिल्ड २६; श्रेयांका पाटील ३/२२, श्री चरणी ३/३२) निकाल: भारत १७ धावांनी विजयी.







