Saturday, February 21, 2026

भारत-ब्राझील द्विपक्षीय व्यापार करारावर शिक्कामोर्तब

भारत-ब्राझील द्विपक्षीय व्यापार करारावर शिक्कामोर्तब

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यातील चर्चेनंतर ट्रेड डीलवर स्वाक्षरी

नवी दिल्ली  : भारत आणि ब्राझीलमधील द्विपक्षीय संबंधांत शनिवारी एक नवा अध्याय जोडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइज इनासियो लुला डी सिल्वा यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चेनंतर भारत-ब्राझील ट्रेड डीलवर अधिकृत स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे व्यापार, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सहकार्याला नवी गती मिळणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष लुला आणि त्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे भारतात स्वागत करताना म्हटले, राष्ट्राध्यक्ष लुला आणि त्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे भारतात स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्यांच्या दृष्टीकोनातून आणि प्रेरणादायी नेतृत्वातून भारत-ब्राझील संबंधांना दीर्घकाळ लाभ झाला आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा भेटी झाल्या असून, प्रत्येक वेळी भारताबद्दल राष्ट्राध्यक्ष लुलांची मैत्री आणि विश्वास स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, राष्ट्राध्यक्ष लुलांचा हा दौरा ऐतिहासिक एआय इम्पॅक्ट समिटला नवी ऊर्जा देणारा असून, भारत-ब्राझील स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अधिक मजबूत करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.

२० अब्ज डॉलर्सपलीकडे व्यापार वाढवण्याचे लक्ष्य

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. येत्या पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलर्सपलीकडे नेण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला आहे. आमचा व्यापार केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. राष्ट्राध्यक्ष लुलांसोबत आलेले मोठे व्यावसायिक प्रतिनिधिमंडळ या विश्वासाची साक्ष देत आहे.

तंत्रज्ञान, एआय आणि ग्लोबल साउथवर भर

या बैठकीत एआय, डिजिटल तंत्रज्ञान आणि स्टार्टअप इकोसिस्टममधील सहकार्यावर विशेष भर देण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील भागीदारी केवळ भारत आणि ब्राझीलपुरती मर्यादित नसून, संपूर्ण ग्लोबल साउथसाठी महत्त्वाची ठरू शकते. या सहकार्यामुळे विकासशील देशांना नव्या विकासदिशा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment