नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या भविष्यातील कनेक्टिव्हिटीबाबत मोठी घोषणा केली असून, आता नाशिक ते मुंबई हे अंतर अवघ्या १२० मिनिटांत म्हणजे २ तासांत प्रवास करता येणार आहे. यामुळे नाशिककरांना आपले मुंबईतील काम एका दिवसात आटोपून सायंकाळी सुखरूप घरी परतणे शक्य होणार आहे.
एसी लोकलसाठी सरकार आग्रही
- काँग्रेसच्या देशविरोधी मानसिकतेविरोधात भाजयुमोचे मुंबईत आंदोलन मुंबई : 'AI इम्पॅक्ट समिट' मधून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणा-या नव ...
नाशिककरांची अनेक वर्षांपासूनची लोकलची मागणी आता 'एसी लोकल'च्या रूपाने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, मुंबई-नाशिक प्रवास आता अवघ्या दोन तासांवर येणार आहे. तसेच नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. सध्या मुंबईची लोकल सेवा केवळ कसाऱ्यापर्यंत मर्यादित आहे. साध्या लोकलला घाट माथ्यावर काही तांत्रिक मर्यादा येत असल्या तरी, एसी लोकल नाशिकपर्यंत नेण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. या योजनेचा आराखडा तयार असून त्यावर वेगाने काम सुरू आहे. जर ही सेवा सुरू झाली, तर नाशिककरांना एकाच दिवसात मुंबईत कामासाठी जाऊन पुन्हा घरी परतणे सहज शक्य होईल. यामुळे नाशिकच्या विकासाला आणि कनेक्टिव्हिटीला एक नवी दिशा मिळणार आहे.
नाशिक विमानतळ आता 'इंटरनॅशनल' होणार
नाशिकची ओळख आता केवळ तीर्थक्षेत्र किंवा द्राक्षांची राजधानी म्हणून मर्यादित न राहता, ती एक आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून उदयास येणार आहे. ओझर विमानतळाला 'इंटरनॅशनल' दर्जा देण्यासाठी सरकारने हालचाली तीव्र केल्या असून, लवकरच नाशिकची हवाई सेवा जागतिक पातळीवर झेप घेणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यामुळे आता मोठी विमाने आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण नाशिकमधून शक्य होणार आहे. केवळ प्रवाशांची ने-आण करणे हाच उद्देश नसून, नाशिकमधील प्रगत शेतीमाल आणि सिन्नर-सातपूर-अंबड एमआयडीसीतील औद्योगिक उत्पादने थेट सातासमुद्रापार पाठवण्यासाठी 'कार्गो' सेवा (मालवाहतूक) सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. या निर्णयामुळे नाशिकच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार असून नाशिक एक ग्लोबल हब म्हणून विकसित होईल.
एसी लोकल आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे सरकारचे लक्ष्य
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुंबई आणि नाशिक या दोन औद्योगिक शहरांमधील अंतर कमी करण्यासोबतच, नाशिकला थेट जगाशी जोडण्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे. या बदलांमुळे नाशिकच्या उद्योग, शेती आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी उभारी मिळणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. मुंबई आणि नाशिकमधील औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही शहरांमधील प्रवास दोन तासांवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर आणि रेल्वेतील आधुनिक सुधारणांचा आधार घेतला जात आहे. या नवीन कनेक्टिव्हिटीमुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाचणार नाही, तर नाशिकमधील उद्योगांना मोठी गती मिळेल आणि शहराच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढेल. एसी लोकल आणि ओझर विमानतळाचा विस्तार हे दोन प्रकल्प नाशिकचे भवितव्य बदलणारे ठरतील, असा विश्वास व्यक्त जात आहे.







