अहमदाबाद : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांची नजर 'सुपर-८' फेरीकडे लागली आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकून अजेय राहण्याचा मान मिळवला असला, तरी टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागली आहे. आता खऱ्या परीक्षेची वेळ आली आहे. २१ फेब्रुवारीपासून सुपर ८ च्या सामन्यांना सुरुवात होणार असून भारताचा पहिला मोठा सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. जरी भारत अजेय असला, तरी पाकिस्तानचा सामना वगळता इतर सामन्यांत भारताची 'दमछाक' झाली होती. विशेषतः नेदरलँडने भारताने उभारलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना जबरदस्त टफ फाईट दिली. यावरून स्पष्ट होते की, सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिका किंवा वेस्ट इंडिजसारख्या संघांविरुद्ध भारताला गाफील राहून चालणार नाही.
ग्रुप १ : भारताचा मार्ग खडतर?
सुपर-८ साठी दोन गट पाडण्यात आले असून भारताचा समावेश 'ग्रुप १' मध्ये आहे. या गटात भारतासोबत खालील संघांचा समावेश आहे: १. दक्षिण आफ्रिका : भारतासाठी सर्वात मोठे आव्हान. २. वेस्ट इंडिज : टी-२० मधील स्फोटक संघ. ३. झिम्बाब्वे : ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवणारा 'जायंट किलर'.
संजू सॅमसनला मिळणार संधी?
अभिषेकच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सॅमसनने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात २२ धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली होती. अभिषेकच्या तुलनेत सॅमसनचा फॉर्म आणि अनुभव लक्षात घेता, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक त्याला प्राधान्य देऊ शकतात.
ग्रुप २ : पाकिस्तानची 'धुळधाण' होणार?
दुसरीकडे 'ग्रुप २' मध्ये इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. या गटात पाकिस्तानची स्थिती नाजूक दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, इंग्लंड आणि न्यूझीलंड तर पाकिस्तानला जड जातीलच, पण श्रीलंका देखील पाकिस्तानची 'धुळधाण' उडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
उपांत्य फेरीचे समीकरण :
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने ४ आणि ५ मार्च रोजी खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात असल्याने, आता त्यांचा सामना थेट सेमीफायनल किंवा फायनलमध्ये होण्याची शक्यता धूसर वाटत आहे. भारतीय संघाला घरच्या मैदानाचा आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा नक्कीच फायदा मिळेल, मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीतील त्रुटी सुधारून मैदानात उतरणे हेच जेतेपदासाठी महत्त्वाचे ठरेल.
अभिषेक शर्माचा 'बॅड पॅच'
आपली पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या अभिषेक शर्मासाठी गट फेरी एखाद्या भयानक स्वप्नासारखी ठरली आहे. सलामीला संधी मिळूनही अभिषेकला तीनही सामन्यांत आपले खाते उघडता आले नाही. सलग तीनवेळा शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्या निवडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 'करो या मरो'च्या या टप्प्यावर संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे समजत आहे.
भारत विरुद्ध द. आफ्रिका : आकडेवारी काय सांगते?
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत झालेल्या ३५ सामन्यांपैकी भारताने २१, तर दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषकातही भारताने ५ वेळा द. आफिकेला धूळ चारली असून २ सामने गमावले आहेत. २०२४ च्या फायनलमध्ये भारताने आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.







